मोकळ्या आभाळाखाली झाडाच्या सावलीत बसून गुरूने दिलेले धडे गिरविणारे विद्यार्थी हे दृश्य गावाकडे अनेकदा दिसते. पूर्वी ‘शांतिनिकेतन’मध्येही दिसत असे. मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेरील डेरेदार वृक्षाखाली मंगळवारी दुपारी अशीच एक शाळा भरली होती. फक्त यात गुणाकार-भागाकाराऐवजी प्रिझनर्स डिलेमा, डॉमिनन्ट स्ट्रॅटेजी, कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रिअम या ‘मायक्रो इकॉनॉमिक्स’मधल्या ‘गेम थिअरी’च्या किचकट संकल्पना उलगडल्या जात होत्या. याशिवाय गावाकडच्या शाळेपेक्षा ही शाळा आणखी एका बाबतीत वेगळी होती. ती म्हणजे या शाळेत विद्यार्थी केवळ गुरूकडून धडे गिरविणे, या एका उद्देशासाठी एकत्र आले नव्हते, तर त्यांना आपल्या गुरूला न्यायही मिळवून द्यायचा आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर भरलेला हातेकर सरांचा हा वर्ग विद्यार्थ्यांच्या याच सनदशीर लढय़ाचा एक भाग होता.
विद्यापीठाच्या घसरत्या शैक्षणिक दर्जाबाबत आणि प्रशासकीय गोंधळावर जाहीरपणे टीका केली म्हणून अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. हातेकर यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. मात्र प्रा. हातेकर विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत. म्हणूनच आपल्या या आवडत्या शिक्षकाच्या बाजूने त्यांचे विद्यार्थी गेला आठवडाभर रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. मंगळवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर हातेकर यांच्या वर्गाला मोठय़ा संख्येने हजेरी लावून विद्यार्थ्यांनी ते प्राध्यापक म्हणून किती प्रिय आहेत, याची चुणूक दाखवून दिली. हा वर्ग एक सनदशीर व प्रतीकात्मक मार्गाने केलेला लढा असला तरी त्यात डॉ. हातेकर यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच्या गांभीर्याने शिकविले आणि विद्यार्थ्यांनीही ते तितक्याच मन लावून आत्मसात केले हे विशेष.
दुपारी तीनच्या सुमारास उन्हं रजा घेण्याच्या तयारीत असताना हा वर्ग सुरू झाला. त्यानंतर तब्बल दोन तासात हातेकर यांनी मायक्रो इकॉनॉमिक्समधील प्रिझनर्स डिलेमा, डॉमिनन्ट स्ट्रॅटेजी, कॉम्पेटिटिव्ह इक्विलिब्रिअम या किचकट संकल्पना विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविल्या. विद्यार्थी वर्तमानपत्राची पाने पसरून त्यावर आनंदाने बसली होती. एका छोटय़ा पांढऱ्या फलकावर मार्कर पेनच्या साहाय्याने हातेकर शिकवत होते. बाजूच्या वर्दळीची व वाहतुकीची पर्वा न करता त्यांचा प्रत्येक शब्द विद्यार्थी कानात साठवून हातातील कागदावर पेनाने उतरवत होते. सुट्टीचा दिवस असूनही ४० ते ४५ विद्यार्थ्यांनी या वर्गाला हजेरी लावली होती. आमदार कपिल पाटील, शाहीर संभाजी भगत यांच्यासह अनेक प्राध्यापकांनी या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती के. शंकरनारायणन यांची मंगळवारी रात्री भेट घेतली. या बैठकीत राज्यपालांनी प्रा. हातेकर यांच्या निलंबनावरून सुरू असलेल्या वादाविषयीही माहिती घेतल्याची चर्चा आहे. आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत प्रा. हातेकर यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली होती. त्या पाश्र्वभूमीवर ही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती के. शंकरनारायणन यांची मंगळवारी रात्री भेट घेतली. या बैठकीत राज्यपालांनी प्रा. हातेकर यांच्या निलंबनावरून सुरू असलेल्या वादाविषयीही माहिती घेतल्याची चर्चा आहे. आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत प्रा. हातेकर यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेतली होती. त्या पाश्र्वभूमीवर ही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.