तेल अविव विद्यापीठासोबत करार; परराष्ट्र संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न
भविष्यात इस्रायलमधील एखादी व्यक्ती तुमच्याशी मराठीत बोलली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तेथे मराठीचे धडे देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई विद्यापीठ आणि तेल अविव विद्यापीठ यांच्यात सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. तसेच भविष्यात अन्य देशांमध्येही मराठी भाषेसाठी सामंजस्य करार करण्याचा मानस मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी कराराप्रसंगी व्यक्त केला.
इस्रायलमध्ये मराठी भाषक लोक मोठय़ा प्रमाणात आहेत. इस्रायलमध्ये मराठी नियतकालिके प्रसिद्ध होतात. दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो, तसेच मराठी नाटकांचे प्रयोगही आयोजित केले जातात. १९९६ साली जागतिक मराठी संमेलनही इस्रायलमध्ये झाले होते. तरी, इस्रायलमध्ये जन्मलेल्या लोकांच्या पुढच्या पिढय़ा मातृभाषा म्हणून हिब्रूच सांगतात. इस्रायली विद्यापीठांत संस्कृत, हिंदी तसेच मल्याळम भाषा शिकण्याची सोय असली तरी मराठी शिकण्याची सोय उपलब्ध नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले. तेल अविव विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या मदतीने मराठीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. मराठी भाषेचा प्रचार हे राज्य मराठी विकास संस्थेचे उद्दिष्ट असल्यामुळे संस्थेने या प्रकल्पात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा