राज्यातील प्राध्यापकांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेला (सेट) अखेर मुहूर्त मिळाला असून ३० ऑगस्टला ही परीक्षा होणार आहे. त्यासाठीचे ऑनलाइन अर्ज २७ जूनपर्यंत भरता येणार आहेत.
स्टेट इलिजिबिलीटी टेस्ट (सेट) ही प्राध्यापकांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी पात्रता परीक्षा या वर्षी ३० ऑगस्टला होणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ सेट आयोजित करते. वर्षांतून दोन वेळा ही परीक्षा होणे अपेक्षित असते. मात्र, तब्बल दीड वर्षांनी राज्यात सेट होणार आहे. यापूर्वी डिसेंबर २०१३ ला राज्यात सेट घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) परवानगी न मिळाल्यामुळे सेट रखडली होती. या वर्षी ३२ विषयांसाठी सेट होणार आहे. या परीक्षेचे ऑनलाइन अर्ज उपलब्ध झाले असून २७ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत, तर परीक्षा शुल्क भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, अमरावती, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, नगर आणि धुळे अशी महाराष्ट्रतील १४ आणि गोव्यातील एका केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. खुल्यागटासाठी ५५० रुपये तर राखीव गटासाठी ४५० रुपये परीक्षा शुल्क आहे. परीक्षेचा अर्ज आणि माहिती http://fyjc.org.in/mumbai या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.