एक-दोन वर्षांचा करारपत्राचा काळ संपला की आयआयटीयन्सनी आपली नोकरी सोडू नये यासाठी ‘कॅम्पस’ भरतीतच रग्गड पगारासमवेत ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन’ देण्याचा उपाय ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’त (आयआयटी) नोकर भरतीसाठी येणाऱ्या मोठमोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्या आजमावू लागल्या आहेत. त्यामुळे करार संपल्यानंतरही सात आकडी पगाराबरोबरच जवळपास तितकाच पैसा ‘एम्प्लॉई स्टॉक’ म्हणून ‘क्रीम’ आयआयटियन्सच्या खिशात पडतो आहे. कॅम्पस भरतीत मिळालेले हे ताज्या दमाचे कर्मचारी आपली नोकरी सोडून दुसऱ्या प्रतिस्पर्धी कंपनीत जाऊ नये, यासाठी कंपन्यांनी दाखविलेले हे गाजर आयआयटीयन्सच्याही पचनी पडते आहे, हे विशेष!
मुंबईसह देशभरातील सर्व आयआयटीच्या प्रांगणात सध्या नोकर भरतीचे वारे वाहत आहेत. सोमवारी या भरतीचा तिसरा दिवस होता. यात नेहमीप्रमाणे मुंबई-आयआयटीची नोकर भरती विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रग्गड वेतन पॅकेजमुळे चर्चेत आहे. मुंबईच्या आयआयटीमध्ये तीन दिवसात मिळून ४० हून अधिक कंपन्यांनी आतापर्यंत हजेरी लावली आहे. त्यात सॅमसंग, फेसबुक, रॉकेट फ्युएल, फेसबुक, याहू, बर्कले, अॅमझॉन आदी कंपन्या यावेळी भरतीत सहभागी झाल्या होत्या. आयआयटीच्या भरतीत या वर्षी पहिल्यांदाच हजेरी लावणाऱ्या ट्विटरने आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांना नोकरी देऊ केली आहे.
या कर्मचारी भरतीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही यावर्षी बाराशेवरून तेराशेवर गेली आहे. अर्थात या सर्व विद्यार्थ्यांना या भरतीत नोकरी मिळतेच असे नाही. पण, यावर्षी पहिल्या दिवशी नोकरीची ऑफर मिळण्याची संख्याही १४० वरून १६० वर गेली आहे.
या वर्षी सात आकडी पगाराबरोबरच बोनस आणि वेतनाइतकेच ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन’ देणाऱ्या कंपन्या मोठय़ा संख्येने आहेत, असे निरीक्षण आयआयटीतील एका ज्येष्ठ प्राध्यापकाने नोंदविले. साधारणपणे या विद्यार्थ्यांशी कर्मचारी म्हणून एक किंवा दोन वर्षांचा करार केला जातो. दोन वर्षांनंतरही नोकरी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यास संबंधित कर्मचाऱ्याला ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन’च्या रूपात त्याच्या वेतनाइतकीच रक्कम वर्षांच्या शेवटी दिली जाते. नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्यास मात्र या पैशावर पाणी सोडावे लागते. अधिक वेतनाच्या मोहापायी आयआयटियन्स आपली नोकरी सोडू नये यासाठी दाखविलेले हे गाजर असते, अशी माहिती या प्राध्यापकाने दिली. उदाहरणार्थ एका कंपनीने एखाद्याला प्रत्येक वर्षांसाठी ८० लाख रुपयांचे वेतन पॅकेज केल्यास त्याला दुसऱ्या वर्षांच्या शेवटी वर्षभराचा ८० लाख रुपये पगार आणि तितक्याच रक्कमेचा ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन’ दिला जातो. अर्थात या गल्लेलठ्ठ ऑफर्ससाठी आयआयटीयन्सना सलग १८ तासांच्या चाचण्या, मुलाखतींच्या टप्प्यांमधून जावे लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा