परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थी-प्राध्यापकांची मागणी
एमएस्सी परीक्षेचे जाहीर केलेले वेळापत्रक एक महिना पुढे ढकलूनही अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नसल्याने मुंबई विद्यापीठाने आणखी किमान महिनाभर तरी परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे.
एमएस्सीकरिता ९ सप्टेंबरला विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर केले. यानुसार २७ ऑक्टोबरला पहिल्या सत्राची परीक्षा सुरू होणार होती. मात्र, मुळातच आधीच्या (बीएस्सी) परीक्षेचा निकाल आणि पर्यायाने एमएस्सीची प्रवेश प्रक्रिया लांबल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये एमएस्सीचे वर्गच ११ सप्टेंबरपासून सुरू झाले. त्यात अवघ्या महिनाभरात परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गोंधळून गेले, पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’च्या (यूजीसी) नियमानुसार किमान ९० दिवस वर्ग घेणे बंधनकारक आहे; परंतु अभ्यासाला अवघे तीसच दिवस मिळत असल्याने परीक्षेला सामोरे कसे जायचे, असा विद्यार्थ्यांचा रास्त प्रश्न होता. त्यावर विद्यापीठाने परीक्षा आणखी महिनाभर म्हणजे ३० नोव्हेंबपर्यंत पुढे ढकलण्याचे ठरविले; परंतु परीक्षा पुढे ढकलूनही विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम आहे, कारण एमएस्सीसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता जो अभ्यास तीन महिन्यांत करायचा तो अवघ्या ६० दिवसांत करावा लागणार आहे, त्यामुळे त्या विषयाला न्याय तरी कसा देणार, असा विद्यार्थ्यांचा सवाल आहे. बरेचसे दिवस सुट्टीतच जाणार असल्याने आम्हाला अध्यापनाच्या दृष्टीने काहीच फायदा नाही, अशी तक्रार भौतिकशास्त्र विषयाच्या एका विद्यार्थ्यांने केली, त्यामुळे जानेवारीपर्यंत तरी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.