जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांची आयआयटीच्या अभियांत्रिकीच्या शाखा धुंडाळण्यास सुरुवात केली असेल किंवा अनेकांनी यापूर्वीच ठरविलेल्या असतील. पण हे सर्व निर्णय घेत असताना अनेक प्रश्न पडत असतील, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला तुमचे पालक, मित्र असतीलच पण तुमच्या मदतीला आयआयटी मुंबईतील आजी-माजी विद्यार्थी एकत्र आले आहेत. आयआयटीच्या संदर्भात तसेच अभियांत्रिकीच्या शाखा निवडायच्या संदर्भात तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्यावर आयआयटीयन्स मार्गदर्शन करणार आहेत.
आयआयटी मुंबईतील आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम हाती घेतला आहे. यासाठी या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फोरम तयार केले असून या फोरममध्ये विद्यार्थ्यांना आयआयटी विषयी माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर यामध्ये विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची कोणती शाखा निवडायची याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध शाखांची, तसेच त्या शाखांमधील पदवीधरांना उपलब्ध संधी याबाबतची माहितीही यात देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या विद्यार्थ्यांपकी काहींनी एक टीम चोवीस तास या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना आयआयटीची संपूर्ण कल्पना यावी, या उद्देशाने फोरम तयार करण्यात आल्याचे आयआयटीयन आणि फोरमचा सदस्य श्रेय सिंग सांगतो. विद्यार्थी https://sites.google.com/site/iitbinfo/  किंवा http://gymkhana.iitb.ac.in/~smp/forum/ या संकेतस्थळांवर भेट देऊन मार्गदर्शन घेऊ शकतात. तसे  https://www.quora.com/How-can-one-get-the-entire-curriculum-of-all-major-branches-in-IIT/answer/ Antariksh-Bothale हा ब्लॉगही नियमित वाचू शकता.

Story img Loader