राज्यभरात दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू होत असून या वर्षी एकूण १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वर्षीपासून दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी परीक्षा खोलीमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ९ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात येणारी माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा (इयत्ता १० वी) ३ मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी या वर्षी १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात ९ लाख ५९ हजार ४५० विद्यार्थी असून गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या ८ हजाराने कमी झाली आहे. मात्र, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण या वर्षी साधारण १२ हजारांनी वाढले असून ७ लाख ७३ हजार ४४८ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. या वर्षी ६ हजार ८७५ अपंग विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्यात ४ हजार २२२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.
परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी मंडळाने राबवलेल्या ‘गैरमार्गाशी लढा’ अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्य़ासाठी ७ या प्रमाणे २४५ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहेत. प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांला कोणत्याही कारणास्तव नियोजित परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्यास, त्याला जवळच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा