परळच्या ‘नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रमविज्ञान शिक्षण संस्था’ या प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेतील ‘मास्टर इन लेबर स्टडीज’ (एमएलएस) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ६ जूनला घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान आदल्या दिवशी फुटलेली प्रश्नपत्रिकाच वाटण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पण, संस्थेचा गलथान कारभार इतका पराकोटीचा आहे की केवळ विद्यार्थ्यांनी या प्रकाराची तक्रार केली नाही म्हणून पेपर फुटला ही बाबच मान्य करायला संस्था तयार नाही. सदोष परीक्षेनुसारच प्रवेश प्रक्रियेचे घोडे पुढे दामटवले जात असल्याने उमेदवारांमध्ये मात्र मोठी अस्वस्थता आहे. सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी आणि निबंधात्मक अशा प्रत्येकी ४० गुणांची लेखी चाचणी असे या परीक्षेचे स्वरूप होते. त्यानंतर १५ गुणांची समूह चर्चा आणि १५ गुण मुलाखतीला असे तीन टप्पे पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड होते.
यावर्षी एमएलएसच्या ५० जागांसाठी २४७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विद्यार्थीसंख्या जास्त असल्याने ५ आणि ६ जूनला अशा दोन दिवशी लेखी परीक्षा घेण्यात आली.
पहिल्या दिवशी १२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तीन वर्गात हे विद्यार्थी विभागले होते. त्यापैकी संस्थेच्या सभागृहात (ऑडिटोरिअम) झालेल्या परीक्षेदरम्यान ‘सामान्यज्ञान’ विषयाच्या प्रश्नपत्रिका कमी पडल्या म्हणून १५ ते २० विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशीच्या प्रश्नपत्रिका वाटण्यात आल्या.
परीक्षेनंतर त्यांच्या आणि इतरांच्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या असल्याचे लक्षात आले. ही प्रश्नपत्रिका दुसऱ्या दिवशीची असावी हे चाणाक्ष विद्यार्थ्यांनी ओळखले. ‘दुसऱ्या दिवशी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी लगेचच ही प्रश्नपत्रिका मिळवून फॅक्स, ई-मेलने वगैरे इतर परीक्षार्थीना पाठविल्या. परीक्षेच्या आधीच पेपर मिळाल्याने दुसऱ्या दिवशी परीक्षा दिलेल्यांना चांगलाच फायदा झाला,’ अशी तक्रार एका विद्यार्थिनीने नाव न छापण्याच्या अटीवर केली.
निवड झालेल्या १२० पैकी बहुतांश विद्यार्थी ६ जूनला परीक्षा देणारे आहेत. त्यामुळे, पहिल्या दिवशी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. ‘सामान्यज्ञानाची सर्व विद्यार्थ्यांची किंवा दुसऱ्या दिवशी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची नव्याने परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा,’ अशी मागणी एका उमेदवाराने केली आहे.
संस्था बंद करण्याचा घाट
गेली काही वर्षे गलथान कारभारामुळे संस्थेची दुर्दशा झाली आहे. कामगार खात्याअंतर्गत चालविली जाणारी ही संस्था दोन वर्षांपूर्वी बंद करण्याचाही घाट होता. मात्र, संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. विद्यार्थ्यांना दिली जाणारी वसतीगृहाची सुविधा बंद करण्याचा प्रयत्न झाला. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत केवळ माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केल्यामुळे ही संस्था तग धरून आहे.

विद्यार्थ्यांकडून तक्रार आली नाही म्हणून..
आश्चर्य म्हणजे हा घोळ लक्षात येऊनही संस्थेतर्फे प्रवेश प्रक्रियेचे घोडे पुढेच दामटवले जात आहे. या संबंधात संस्थेचे प्रबंधक ई. के. गटकळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पेपर फुटल्याची बाब फेटाळून लावली. आमच्याकडे एकाही विद्यार्थ्यांने पेपरफुटीची तक्रार नोंदविली नाही. त्यामुळे, परीक्षा पुन्हा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत त्यांनी पेपरफुटीची दखल घेण्यास नकार दिला.

Story img Loader