दहावीच्या मार्च, २०१३मध्ये झालेल्या परीक्षेत ठाण्यातील एका विद्यार्थ्यांच्या मराठी भाषेच्या उत्तरपत्रिकेवर फेरफार (ओव्हररायटिंग) केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या ओव्हररायटिंगमुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणांवर परिणाम झाल्याची गंभीर तक्रार पालकांनी केली आहे.
यंदापासून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. यामुळेच हा प्रकार उघड होण्यास मदत झाली आहे. अक्षय भोसले नामक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार नेमका कुणी केला असा प्रश्न आहे.
अक्षयला दहावीच्या परीक्षेत ९५.२७ टक्के होते. निकाल जाहीर झाल्यानंतर त्याने मराठीसह भूगोल, इतिहास, संस्कृत, बीजगणित, भूमिती या विषयांच्या उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. सर्वप्रथम त्याला उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी मिळाल्या. त्यात आपण लिहिलेल्या मराठीच्या उत्तरपत्रिकेवर कुणीतरी जाणूनबुजून फेरफार केल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. अक्षयने उत्तरपत्रिका जेल पेनने लिहिली होती. तर ओव्हररायटिंग बॉलपेनने केले गेले आहे. त्यामुळे, मूळचा मजकूर आणि ओव्हररायटिंग कोणते हे ओळखणे सहज शक्य होते. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार केवळ दीघरेत्तरी प्रश्नांच्या बाबतीत करण्यात आला आहे. अक्षयने योग्य पद्धतीने लिहिलेले शब्द अतिरिक्त काना, मात्रा, वेलांटी देऊन  जाणूनबुजून बिघडवण्यात आले आहेत आणि त्यालाच परीक्षकांनी अधोरेखित करून त्या अशुद्धलेखनाच्या चुका म्हणून दाखवून दिल्या आहेत. ८० गुणांच्या उत्तरपत्रिकेत असे तब्बल ३० फेरफार केल्याचे अक्षयचे वडील शशिकांत भोसले यांनी दाखवून दिले
आहे.
भोसले यांच्या तक्रारीनंतर ‘मुंबई विभागीय मंडळा’ने मूळ उत्तरपत्रिका काढून तपासून पाहिली असता उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचे स्पष्ट दिसून आले. मंडळाने २५ सप्टेंबरला भोसले यांना पत्र पाठवून फेरफार केल्याचे मान्यही केले. मात्र, या बदलांमुळे गुणदानावर काहीही परिणाम झालेला नाही, असा दावा मंडळाने केला आहे.
गंभीर दखल
या संबंधात विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित प्रकाराची आपण गांभीर्याने दखल घेत असल्याचे सांगितले. या संबंधात परीक्षक, मॉडरेटर आणि विद्यार्थ्यांची चौकशी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.