अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना ‘इतर मागास प्रवर्गा’साठी (ओबीसी) राखीव असलेल्या कोटय़ातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी दिलेल्या मुदतीत ‘नॉनक्रीमीलेअर’ प्रमाणपत्र सादर करणे शक्य होणार नसल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. त्यामुळे, या प्रमाणपत्रासाठी पालकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र मुंबईसह राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात गेले काही दिवस दिसत आहे.
अभियांत्रिकीसाठी अर्ज भरण्याची शुक्रवारी शेवटची मुदत आहे. अर्जाबरोबरच विविध प्रवर्गातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात, जात पडताळणी, नॉनक्रीमीलेअर (उत्पन्न दाखला) आदी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करणेही बंधनकारक आहे. पण, नॉनक्रीमीलेअर प्रमाणपत्र मिळविण्यात अनंत अडचणी येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळालेले नाही. या प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचा तपशील दाखविणारा १६ क्रमांकाचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे, परंतु अनेक खासगी आस्थापनांमध्ये हा अर्ज उशिरा मिळतो. त्यामुळे, पालकांना प्रवेशाच्या तोंडावरच हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यातून काही तहसीलदार कार्यालयांमधून कर्मचारीही विद्यार्थी आणि पालकांना सहकार्य करीत नसल्याने प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत आहेत. या प्रमाणपत्राअभावी खुल्या वर्गातून प्रवेश घेणे भाग पडणार असल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे, हे प्रमाणपत्र सादर करण्याला मुदतवाढ द्या, वा कागदपत्रे सादर केलेल्या पावतीच्या पुराव्यावर प्रवेश द्या, अशी मागणी पालकांकडून होते आहे. मात्र, या दोन्ही शक्यता तंत्रशिक्षण संचालकांनी फेटाळून लावल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ जूनपर्यंत अर्जामध्ये दुरुस्ती शक्य
‘प्रवेश घेतानाच सर्व आवश्यक प्रमाणपत्रे तपासून घ्यावी, असा नियम आहे. या संबंधात आम्ही गेले वर्षभर पालकांसाठी सूचना प्रसिद्ध करीत आहोत. त्यामुळे, प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ देता येणे शक्य नाही,’ असे तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांनी स्पष्ट केले. उद्या अर्ज भरण्याची शेवटची मुदत असली तरी १८ जूनपर्यंत पालकांना आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत तरी आवश्यक ती प्रमाणपत्रे जमा करून अर्जात बदल करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents students scurry for non creamy layer certificate