खासगी शाळांच्या प्रभावातही शिरूरची नगरपालिका शाळा क्रमांक ६ ने आपला पट टिकवला आणि वाढविला. यासाठी शाळेने नियोजनबद्धकेलेले प्रयत्न व उपक्रमांविषयी..
शिरूरच्या नगरपालिका शाळा क्रमांक ६मध्ये विविध स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध स्तरातील पालकांची-विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन उपक्रमांची आखणी केली जाते. त्यासाठी समाजातील विविध सामाजिक संस्था व शिक्षणप्रेमी दानशूर व्यक्ती शाळेच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.
शाळेत शिस्तपालन व वक्तशीरपणा या गोष्टींना महत्त्व दिले जाते. त्यातही स्वयंशिस्त राखण्यावर विशेष भर असतो. शाळेत प्रवेश करताच क्षणी इमारतीच्या परिसरातील बोलक्या भिंती लक्ष वेधून घेतात. शाळेच्या भिंतींचा प्रत्येक कोपरा आपणाला काही तरी सांगत असतो.
शालेय कामकाजाची सुरुवात दैनंदिन स्वच्छतेच्या कामाने होते. विद्यार्थी आपापला वर्ग, व्हरांडा स्वच्छ करतात. त्यातून श्रमप्रतिष्ठेचे मूल्य त्यांच्यावर बिंबवले जाते. परिपाठामध्ये राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना याचबरोबरच चालू घडामोडींविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांचे सर्वसामान्य ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न होतो.
शाळेत विविध सण, समारंभ आवर्जून साजरे केले जातात. हे करताना पारंपरिकता व आधुनिकता यांचा मेळ घातला जातो. सण साजरे करण्यामागचे ऐतिहासिक संदर्भ, पौराणिक कथा सांगितल्या जातातच शिवाय आजच्या बदलत्या काळात हे सण आपण कशा प्रकारे साजरे केले पाहिजेत याचे मार्गदर्शन केले जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरू, माता, पिता, यांना वंदन करण्याबरोबरच नद्या, वृक्ष, सागर, आकाश या नैसर्गिक रूपांचेही आपण वंदन केले पाहिजे हे मनावर ठसविले जाते. यामुळे निसर्गाशी असणारी बांधीलकी समजते.
गणेशोत्सवानिमित्त विविध विषयांवरील स्पर्धाचे आयोजन होते. हस्ताक्षर, चित्रकला, रांगोळी, गीतगायन, कथाकथन, मनोरंजनात्मक खेळ वगैरे. स्पर्धेतील निवडक कलाकृतींचे प्रदर्शन भरविले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाबरोबर मार्गदर्शनही लाभते.
नवरात्रातील भोंडल्यात पारंपरिक गीतांबरोबरच पर्यावरणपर गीते म्हटली जातात. पर्यावरण गीतांद्वारे निसर्गाचे जतन व संवर्धनाचा संदेश दिला जातो. आमच्या माता, पालक, भगिनी या कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच संक्रातीनिमित्त हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात शैक्षणिक साहित्याशी निगडित वस्तू वाण म्हणून वाटल्या जातात. जेणेकरून त्या वस्तूचा उपयोग त्यांच्या पाल्याला होईल. या कार्यक्रमातून शाळेला समाजाशी जोडण्याचे काम आम्ही करतो.
विद्यार्थ्यांना निसर्ग निरीक्षणाची सवय लागवी, ऐतिहासिक, धार्मिक वास्तूंची माहिती व्हावी, महती समजावी यासाठी शैक्षणिक सहली व क्षेत्रभेटींचे आयोजन केले जाते. या निमित्ताने शिरूर सत्र व दिवाणी न्यायालय, नगरपालिका कार्यालय, विविध बँका, पोस्ट ऑफिस, जलशुद्धीकरण केंद्र, हवामान केंद्र, कागद कारखाना या ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणी चालणाऱ्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांनी मिळविली आहे. आमचे शिक्षकही इतर उत्कृष्ट व आदर्श शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणचे चांगले उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करतात. शाळेत गीतमंच असून त्या माध्यमातून अनेक गीतांची तयारी करवून घेतली जाते. समूहगीते, देशभक्तीपर गीते, अभंग, भक्तीगीत यांचे गायन केले जाते. लेझीम पथक, ढाल-तलवार पथक, झांजपथकही तयार आहे. विविध राष्ट्रीय नेत्यांच्या जयंतीनिमित्त, स्मृतिदिनानिमित्त आयोजिल्या जाणाऱ्या बालसभांचे नियोजन विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने करीत असल्याने त्यांच्या अंगातील नेतृत्वगुणांना चालना मिळते. कविता पाठांतर, गायन, पाढे पाठांतर, नकाशे भरणे, टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करणे, विविध प्रकारचे संग्रह करणे यांतून विद्यार्थी अनुभवसमृद्ध करण्यावर शाळेचा भर असतो. आता शालेय परिसरात मुलांच्या खेळण्याच्या साहित्यासह बालोद्यान करण्याचा विचार आहे.
चिरंतन शिक्षण : व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर
खासगी शाळांच्या प्रभावातही शिरूरची नगरपालिका शाळा क्रमांक ६ ने आपला पट टिकवला आणि वाढविला. यासाठी शाळेने नियोजनबद्धकेलेले प्रयत्न व उपक्रमांविषयी..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2012 at 05:15 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality development