राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होणाऱ्या क्रीडा महोत्सवात विद्यापीठाकडून खेळणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना सरावासाठी अद्यापही क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडांगणावर, राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव येत्या १७ ते २१ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ५ जानेवारी ते १४ जानेवारीपर्यंत प्रशिक्षण शिबीर घेतले जात आहे. बास्केट बॉल (पुरुष व महिला), व्हॉलीबॉल (महिला व पुरुष), हँडबॉल (पुरुष व महिला), कबड्डी (महिला व पुरुष), खो-खोसाठी (महिला व पुरुष), तसेच धावपटूंची नावे व संघ घोषित करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कनिष्ठ स्तरासह राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करून पदके मिळवावीत, अशी अपेक्षा करायची, मात्र त्यांना सतत सोयीसुविधांच्या अभावात खेळवत रहायचे, ही विद्यापीठाची परंपरा यंदाही मोडीत निघालेली नाही. विद्यापीठाने घोषित केलेल्या कबड्डी आणि खो-खोच्या पुरुष व महिलांच्या संघाला सरावासाठी अद्यापही मैदान मिळालेले नाही. हे दोन्ही अस्सल भारतीय खेळ मातीवर खेळले जातात, मात्र त्यांना मैदानच न मिळाल्याने खुंटे न गाडलेल्या गवतावर त्यांना खेळावे लागत आहे. त्यामुळे मूलभूत सुविधाच उपलब्ध नसतील तर खेळाडूंनी यश मिळवायचे कसे, असा सवाल खेळाडूंनी केला आहे.
दुसरे म्हणजे, शरीराचे पोषण होईल आणि क्षमता वाढतील, असे अन्न न्याहारी आणि जेवणाच्या वेळी द्यायला हवे. नागपूर विद्यापीठाच्या अखत्यारित असलेल्या विविध जिल्ह्य़ातील खेळाडूंनी क्रीडा महोत्सवात भाग घेतला आहे. त्यांना केवळ एक उकडलेले अंडे व एक ग्लासभर दूध सकाळी न देता सायंकाळी दिले जाते. सकाळी दिली जाणारी न्याहारीसुद्धा पोषणमूल्यरहित असते. फळे किंवा अंकुरित कडधान्य देणे गरजेचे आहे, मात्र ते मिळत नसल्याने बाहेर जाऊन खावे लागते, अशीही सर्वच खेळाडूंची तक्रार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा