सरकारकडून दिली जाणारी शिष्यवृत्ती आणि अभ्यासवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनीही त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले असून आधार कार्ड काढणाऱ्या केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत.
आधारकार्ड दिल्यानंतर तरी आमची शिष्यवृत्ती वेळेत मिळणार का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.
शासनाकडून विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती आणि अभ्यासवृत्ती दिल्या जातात. या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होते. मात्र आता या शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँक खात्याला जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आधार कार्ड काढण्यासाठी विद्यापीठाकडून साहाय्य करण्यात यावे, असे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाने ११ जानेवारीला विद्यापीठांना देण्यात आल्यामुळे आधार कार्ड काढण्यासाठी केंद्रावर विद्यार्थ्यांंनी गर्दी केली आहे.
आधीच सर्वसामान्य नागरिकांनाच आधार कार्ड मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत असताना आता विद्यार्थ्यांनाही अभ्यास सोडून आधार कार्डाच्या रांगेत शिरावे लागत आहे. शिक्षणासाठी बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक आधारकार्डबाबत सूचना देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘‘मुळातच दोन वर्षे शिष्यवृत्ती मिळालेली नाही. शिष्यवृत्तीसाठी यापूर्वी रहिवासी दाखला, आवश्यक तेथे जात प्रमाणपत्र अशी सर्व कागदपत्रे जोडूनही सरकारने आता अचानक आधारकार्ड मागितले आहे. साधारण पंधरा दिवसांमध्ये आधार कार्ड देण्यात यावे अशा सूचना महाविद्यालयांनी दिल्या आहेत. त्यामुळे सर्व कागदपत्रे गोळा करून आधारकार्ड काढण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.’’
अनेक विद्यार्थ्यांना गेली दोन, तीन वर्षे शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याबाबत एका न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाने दिले आहे. आधारकार्ड दिल्यावर तरी आमची शिष्यवृत्ती वेळेत जमा करणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा