‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’त (आयआयटी) अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता राखीव असलेल्या जागा भरण्यासाठी ‘जेईई-अॅडव्हान्स’ची किमान गुणमर्यादा यंदा खाली आणावी लागली आहे. त्यामुळे, गेली दोन वर्षे या विद्यार्थ्यांकरिता आयआयटीने बंद केलेले पूर्वतयारी वर्ग (प्रिपेटरी) या वर्षी पुन्हा सुरू करावे लागणार आहेत.
एससी-एसटी, ओबीसी, अपंग आदी विविध प्रकारच्या राखीव कोटय़ातील जागा भरण्यासाठी आयआयटीला प्रवेशासाठीची पात्रता गुणमर्यादा खाली आणावी लागते. हे विद्यार्थी पुढच्या अभ्यासात मागे पडत असल्याचे लक्षात आल्याने आयआयटीने ९०च्या दशकात त्यांच्यासाठी वर्षभराचे पूर्वतयारी वर्ग सुरू केले. पात्रता गुणमर्यादेपेक्षा पेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशानंतर या वर्गातून कसून तयारी करवून घेतली जात असे. या वर्गामुळे विद्यार्थ्यांच्या पुढच्या शैक्षणिक कामगिरीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले होते. पण, गेली दोन वर्षे अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांचा जेईईमधील गुणवत्तेचा आलेख उंचावल्याने आयआयटीला राखीव जागा भरण्यासाठी पात्रता गुणमर्यादा खाली आणावी लागत नव्हती. परिणामी असे वर्ग घेण्याची आवश्यकता उरली नाही. त्यामुळे केवळ अपंग विद्यार्थ्यांकरिताच हे वर्ग चालविले जात असत. परंतु या वर्षी सर्व प्रकारच्या प्रवर्गातील जागा भरण्यासाठी आयआयटीला बऱ्यापैकी कसरत करावी लागली आहे. त्यामुळे, कटऑफ पेक्षा कमी गुण मिळालेल्या तब्बल २७६ विद्यार्थ्यांकरिता आयआयटीला पूर्वतयारी वर्ग घ्यावे लागणार आहेत. अर्थात यापैकी बहुतांश विद्यार्थी (१२८) अपंग प्रवर्गातून प्रवेश घेतलेले आहेत. तर उर्वरित विद्यार्थी ओबीसी (११९), एससी (१९) आणि एसटी(१०) प्रवर्गातील आहेत.
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा निकाल घसरण्यास यंदाचे जेईईचे बदललेले स्वरूप कारणीभूत ठरले आहे. दुसऱ्या टप्प्यातील जेईई-अॅडव्हान्स या परीक्षेकरिता केवळ दीड लाख विद्यार्थ्यांनाच पात्र ठरविण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यासाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे राखीव प्रवर्गातील होते.
आयआयटीत मागासवर्गीयांसाठी पूर्वतयारी वर्ग
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’त (आयआयटी) अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता राखीव असलेल्या जागा भरण्यासाठी ‘जेईई-अॅडव्हान्स’ची किमान गुणमर्यादा यंदा खाली आणावी लागली आहे. त्यामुळे, गेली दोन वर्षे या विद्यार्थ्यांकरिता आयआयटीने बंद केलेले पूर्वतयारी वर्ग (प्रिपेटरी) या वर्षी पुन्हा सुरू करावे लागणार आहेत.
First published on: 25-06-2013 at 03:42 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparatory classes in iit for backwared student