प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांत शिक्षकपदासाठी ‘टीईटी’ परीक्षा सक्तीची केली. या परीक्षेचा निकाल कमी असल्याने अनेकांना त्याविषयी भीती वाटते. परंतु अभ्यास, नियोजन, परीक्षेची माहिती घेतल्यास उत्तीर्ण होणे अवघड नाही. नियोजनपूर्वक अभ्यास व सातत्य राखले, तर ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होता येऊ शकते. डी.एड. व बी.एड. करता करता ‘टीईटी’ उत्तीर्ण होता येईल. ‘टीईटी’तयारीसाठी अभ्यासक्रमातील घटकांनुसार इतरही स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा उपयोग होऊ शकतो.
डी.एड./बी.एड.चा अभ्यासक्रम व ‘टीईटी’ : डी.एड./बी.एड. अभ्यासक्रमातील सर्व घटक ‘टीईटी’साठी महत्त्वाचे आहेत, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाचे वाचन आवश्यक आहे. तयार प्रश्नोत्तरांच्या पाठांतरापेक्षा स्वत: सराव प्रश्न तयार करा व त्याचे उत्तर वाचनाच्या माध्यमातून शोधा. त्याचप्रमाणे उत्तरे शोधण्यासाठी केलेल्या वाचनातील संदर्भही शोधा.
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र : या विषयासाठी शैक्षणिक मानसशास्त्र, शिक्षण व विकास प्रक्रिया, व्यक्तिभेद, बुद्धिमत्तेचे विविध सिद्धांत व मापन, अध्ययन अर्थ, घटक, अपवादात्मक बालकांचे शिक्षण, मानसिक आरोग्य व स्वास्थ्य, लैंगिक शिक्षण, मार्गदर्शन व समुपदेशन, तत्त्वज्ञान व शिक्षण, तत्त्वज्ञानाचे पाश्चात्त्य संप्रदाय, तत्त्वज्ञानाचे भारतीय संप्रदाय, शैक्षणिक विचारवंतांचे योगदान, भारतीय संविधान, राष्ट्रीय मूल्ये, भारतीय शिक्षण, शैक्षणिक समस्या, शैक्षणिक मूल्यमापन व व्यवस्थापन, शिक्षकाची गुणवैशिष्टय़े यांच्यावर आधारित प्रश्नांचा समावेश ‘टीईटी’ला असतो. त्यासाठी डी.एड./बी.एड. नियमित अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
भाषा : यासाठी इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतच्या अभ्यासक्रमामधील संबंधित भाषेचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी डी.एड. व बी.एड. करतानाच या भाषांमधील व्याकरणाकडे विशेष लक्ष द्या. या घटकातील वाचन, सूक्ष्म निरीक्षण हवे. उतारे व त्यांवरील प्रश्नांसाठी वैचारिक आकलन, भाषा विषयाची तयारी असणे गरजेचे आहे. भाषा विषयाची तयारी डी.एड./बी.एड.च्या सराव पाठाच्या तयारीत अधिक चांगली होते. भाषेच्या अभ्यासासाठी पूरक वाचन हवे.
गणित व विज्ञान : या विषयामधून तर्कशास्त्रीय क्षमता व बुद्धिमापन केले जाते. हा भाग बहुतेक विद्यार्थ्यांना अवघड जातो. या विषयातून दोन गोष्टींतील फरक, टक्केवारी, एकूण आकडेवारी, सरासरी, विक्री, तुलना, समानता, किंमत भाववाढ, नफा-तोटा, शेकडेवारी, क्रम, लसावि, मसावि, वर्गमूळ अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यासाठीच्या सर्व क्रिया सोप्या असतात.
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, सरासरी, फरक अशा आठवीपर्यंतच्या गणितात अभ्यासलेल्या गोष्टी करायच्या असतात. कला शाखेतील विद्यार्थ्यांना हा भाग अवघड वाटतो. दहावीनंतर गणिताचा संबंध तुटलेला असतो. बरेच विद्यार्थी हा घटक अवघड आहे म्हणून दुर्लक्ष करतात. सातत्यपूर्ण सरावाने तो भागही सहज सुटेल.
परिसर अभ्यास व समाजशास्त्र : या विषयासाठी इयत्ता तिसरी ते आठवीच्या अभ्यासक्रमातील पाठय़पुस्तकातून अभ्यास करावा. तसेच प्रत्येक विषयाच्या म्हणजे परिसर, इतिहास, भूगोल विषयातील स्वत:च्या नोंदी करून ठेवा. इतर स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा, सामान्यज्ञानाच्या पुस्तकांचा या विषयासाठी उपयोग होऊ शकेल. अवांतर वाचन, पुस्तकांचा संदर्भ वापरून अभ्यास करताना विषय व त्या विषयातील पूरक अभ्यासक्रम असावा.
प्रा. सचिन परशुराम आहेर, सेवासदन अध्यापक विद्यालय
* डी.एड. व बी.एड.च्या अभ्यासक्रमातच टीईटीचाही अभ्यास आहे. त्यामुळे नियमित अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करू नका.
* ‘टीईटी’च्या अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी रोज स्वत: किमान १०० वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
* आत्मविश्वास, नियोजन, कष्टाची तयारी ठेवा. भीती बाळगू नका.
* अभ्यासक्रमातील क्रमिक पुस्तकांबरोबरच विषयाशी संबंधित दर्जेदार पुस्तके, नियतकालिके यांचेही वाचन आवश्यक आहे.
* रोज एक तरी वर्तमानपत्र वाचा.
* विषयातील जेवढी संदर्भ पुस्तके चाळता, वाचता येतील तेवढी वाचावीत.
* गेल्या वर्षांची प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रमाचे अवलोकन करावे. अभ्यासातील सातत्य खूप महत्त्वाचे असते. काही दिवस अभ्यासच झाला नाही असे होता कामा नये.