‘महाराष्ट्र नॉलेज कॉपरेरेशन’च्या (एमकेसीएल) सहकार्याने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या प्रयत्नांच्या मर्यादा पहिल्याच वर्षी उघड झाल्या आहेत. दोन दिवसांतच विद्यापीठाचे नोंदणीसाठीचे संकेतस्थळ दाद देईनासे झाले. त्यामुळे हैराण झालेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणीची प्रक्रिया बाजूला ठेवून विद्यापीठाकडे तक्रार नोंदविण्यास सुरुवात केली आहे.
पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या संकेतस्थळावर अर्ज भरून त्याचे प्रिंटआऊट विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेशासाठी सादर करायचे आहेत. मात्र, वारंवार ‘क्लिक’ करूनही विद्यापीठाचे संकेतस्थळ सोमवारी दाद देत नव्हते. सायंकाळी अखेर रडतखडत संकेतस्थळाने काम करणे सुरू केले. मात्र, मंद गतीमुळे विद्यार्थ्यांना नोंदणी करणे शक्यच झाले नाही.
दुपापर्यंत संकेतस्थळ कामच करत नव्हते. त्यानंतरही ते फारच धीम्या गतीने चालत असल्याने माझे छायाचित्र आणि सही अपलोड करायला मला एक तास लागला, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने दिली. एकदा नोंदणी केल्यानंतर २४ तासांच्या आत विद्यार्थ्यांना ही माहिती ‘निश्चित’ (कन्फर्म) करायची आहे. पण, सव्र्हर डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना २४ तासांत माहिती निश्चित करता येईल की नाही याबाबत शंका आहे.
काही विद्यार्थ्यांची तर नोंदणी पूर्ण झाली. पण संकेतस्थळाने मध्येच काम करणे थांबविल्याने त्यांना अर्जाची प्रिंटआऊटच घेता आली नाही. या संथगतीमुळे सकाळी १० ते दुपारी ३पर्यंत आमच्या महाविद्यालयात केवळ तीन अर्ज अपडेट करून झाले होते, असे ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्यांने सांगितले. त्यामुळे, काही पदवी महाविद्यालये आपल्याकडेच विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेत आहेत.
आतापर्यंत केवळ ५० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करून झाली आहे. एकाचवेळी हजारो विद्यार्थी संकेतस्थळावर आल्याने त्यावर मोठा भार येऊन त्याची गती कमी झाली असे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. आम्ही आणखी एक सव्र्हर उद्या लावणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
एकदा तोंड भाजूनही
विद्यापीठ एमकेसीएलच्या मदतीने ही नोंदणी प्रक्रिया राबविते आहे. आतापर्यंत दोन वेळा हॉलतिकीट वाटपात एमकेसीएलने घातलेल्या घोळामुळे विद्यापीठाचे तोंड भाजले आहे. हॉलतिकिटांमध्ये प्रचंड चुका करून एमकेसीएलने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप दिला होता. एमकेसीएलच्या तांत्रिक मर्यादा त्या आधी २००९साली अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेळेसही स्पष्ट झाल्या होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा