अपवाद वगळता सर्व केद्रांवर परीक्षा सुरळीत
ओळखपत्रावरील छायाचित्रे जुळत नाहीत किंवा विलंब झाल्याच्या कारणास्तव परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्याबाबत काही उमेदवारांनी केलेल्या तक्रारी वगळता शनिवारी ‘महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा’ची पूर्व परीक्षा सुरळीत पार पाडली. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रवेशपत्रांबाबत काही अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वारंवार करूनही प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी मात्र परीक्षा केंद्रांवर थोडे गोंधळाचे वातावरण होते. परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत केंद्र बदलत असल्यामुळे उमेदवारांचा परीक्षेच्या दिवशी गोंधळ उडाला. या गोंधळामुळे अनेक उमेदवारांना परीक्षेला उशीर झाला, तर काही उमेदवारांना तर परीक्षेची संधी गमवावी लागली आहे.
राज्यभरात एकूण ९८० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. तब्बल २ लाख ९७ हजार उमेदवार या परीक्षेला बसले होते. धुळे, औरंगाबादमध्ये काही उमेदवार परीक्षा केंद्रांवर उशीरा पोहोचले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांना केंद्रांवर प्रवेश नाकारले. तर पुण्यात काही उमेदवारांच्या ओळखपत्रावर भलत्याच व्यक्तीची छायाचित्रे आढळून आल्याने त्यांना परीक्षेला बसू दिले गेले नसल्याची तक्रार आहे.
पुण्यातील एका केंद्रावर एकच परीक्षा क्रमांक एकापेक्षा अधिक उमेदवारांना देण्यात आल्याचे परीक्षेच्या वेळी लक्षात आले. मात्र, या सर्व उमेदवारांना परीक्षेला बसू देण्यात आले, अशी माहिती उमेदवारांनी दिली. काही उमेदवारांना यामुळे परीक्षेची संधी गमवावी लागली आहे. प्रवेशपत्रातील गोंधळामुळे परीक्षाच देऊ न शकलेल्या उमेदवाराने सांगितले, ‘‘परीक्षेच्या दिवशी सकाळी मी प्रवेशपत्राची प्रिंट आउट घेतल्यानंतर प्रवेशपत्रावर वेगळेच नाव असल्याचे लक्षात आले. प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्रावर जाऊन ही बाब पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून दिली. मात्र, नाव वेगळे असल्यामुळे परीक्षेला बसता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. पुन्हा एकदा प्रोफाइल उघडून प्रवेशपत्र मिळते का हे पाहिले. मात्र, दुसऱ्या वेळीही दुसऱ्याच नावाचे प्रवेशपत्र मिळाले. ही गोष्ट मी केंद्रावर पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून दिली. पण तोपर्यंत परीक्षा सुरू झाली होती. त्यामुळे मला परीक्षेला बसू देण्यात आले नाही.’’
व्हायरसमुळे एमपीएससीकडे संगणकावर असलेली अर्जदार उमेदवारांची संपूर्ण माहिती एप्रिलमध्ये करप्ट झाली होती. परिणामी एमपीएससीला ७ एप्रिलला होणारी पूर्व परीक्षा रद्द करावी लागली होती. दरम्यानच्या काळात एमपीएससीने सर्व उमेदवारांकडून वैयक्तिक जुजबी माहिती मागवित नव्याने ओळखपत्रे पाठविली.
पण, मूळ अर्जदारांपैकी ९ हजार उमेदवारांनी ही माहिती अपडेट केली नव्हती. त्यापैकी सर्वाधिक उमेदवार पुण्यातील (चार हजार) होते. तर मुंबईतील दोन हजार उमेदवारांनी आपली माहिती अपडेट केली नव्हती. माहिती अपडेट न करणाऱ्या या विद्यार्थ्यांनाही एमपीएससीने शनिवारच्या परीक्षेला बसण्याची मुभा दिली होती.
भाषांतराची गडबड?
यंदा प्रथमच घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका क्रमांक दोनमधील ४२ ते ४८ क्रमांकाचे प्रश्न व हे प्रश्न ज्या उताऱ्यांवर आधारलेले होते ते केवळ एकाच भाषेतून उपलब्ध करून देण्यात आले होते.
प्रश्न क्रमांक १ ते ४८ हे वेगवेगळ्या उताऱ्यांवर आधारलेले होते. हे उतारे व त्यावरील प्रश्न (४२ ते ४८ क्रमांकाच्या प्रश्न व उतारे वगळता) मराठी व इंग्रजीतून उपलब्ध करून देण्यात आले होते.
पण, ४२ ते ४५ क्रमांकाचे प्रश्न व त्यांचा उतारा केवळ मराठीतून देण्यात आला होता. तर ४६ ते ४८ क्रमांकाचे प्रश्न व त्यांचा उतारा फक्त इंग्रजीतून देण्यात आल्याने उमेदवार गोंधळून गेले.
या संबंधात आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता, आपण
अद्याप प्रश्नपत्रिका पाहिलेली नाही, असे त्यांनी सांगितले.
राज्यसेवा पूर्व परीक्षेची काठिण्य पातळी वाढली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची काठिण्य पातळी वाढली असून गुणवत्तेचा कस या परीक्षेमध्ये लागेल, अशी प्रतिक्रिया तज्ज्ञांनी आणि उमेदवारांनीही व्यक्त केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणेच ही परीक्षा असल्यामुळे या परीक्षेतही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अधिक फायदा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आयोगाच्या बदलणाऱ्या परीक्षा पद्धतीचे तज्ज्ञ आणि उमेदवारांकडून स्वागत करण्यात आले. याबाबत ‘पृथ्वी अ‍ॅकॅडमी’चे संचालक विश्वनाथ पाटील यांनी सांगितले, ‘‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बदललेली परीक्षा पद्धत स्वागतार्ह आहे. या परीक्षेची काठिण्य पातळी वाढल्याचे दिसत आहे. ज्या उमेदवारांना विषय नीट समजला असेल, त्या उमेदवारांसाठी ही परीक्षा सोपी ठरली असेल. ’’
‘द युनिक अ‍ॅकॅडमी’चे संचालक तुकाराम जाधव यांनी सांगितले, ‘‘या वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षेची काठिण्य पातळी वाढवून दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने उत्तम पाऊल उचलले आहे.’’