मुंबई विद्यापीठाने श्रेयांक श्रेणीच्या सादर केलेल्या ७५:२५ या नव्या सूत्राला शिक्षक संघटनेचा विरोध होत असताना आता प्राध्यापक नीरज हातेकर यांनीही या सूत्राला विरोध दर्शविला आहे. या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
या पद्धतीत आंतरज्ञानशाखीय दृष्टिकोनाचा पूर्णपणे अभाव असल्याची टीका प्राध्यापक हातेकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. श्रेयांक पद्धतीत सध्या सुरू असलेली सहामाही पद्धत बंद करत त्याऐवजी वार्षकि पद्धत सुरू करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापीठातर्फे दोन वर्षांपासून श्रेयांक मूल्यांकन पद्धत राबविण्यास सुरुवात झाली. ही पद्धत ६०:४० अशा गुणसूत्राने राबविली जात होती. या पद्धतीचा गैरवापर आणि त्यातील त्रुटी लक्षात घेऊन या पद्धतीला प्राध्यापकांनीच विरोध केला. यानंतर काही दिवसांपूर्वी आढावा समितीने ७५:२५चे सूत्र सुचविले. या नव्या सूत्रातही काही त्रुटी असल्याने शिक्षक संघटना विरोध करीत आहे. यातच प्राध्यापक हातेकर यांनीही यामध्येही आंतरज्ञानशाखीय दृष्टिकोनाचा अभाव असल्याचे स्पष्ट केले. या पद्धतीनुसार जे विद्यार्थी चाचणी परीक्षेला सत्रान्त परीक्षेला काही कारणांनी बसू शकत नाहीत त्यांना एक संधी म्हणून परीक्षा देता येते.
हातेकर यांनी सुचविलेले बदल
* सहामाही परीक्षा रद्द करून वार्षकि परीक्षा पद्धत असावी.
* प्रत्येक अभ्यासक्रमाची ४० गुणांची सहामाही परीक्षा आणि ६० गुणांची वार्षकि परीक्षा असावी.
* वार्षकि परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत २० गुण सहामाहीच्या अभ्यासक्रमावर आधारित असावेत.
* बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी, या तीन वर्षांच्या पदवीसाठी एकूण ९६ मूल्ये असतील.
* शेवटच्या वर्षी ज्या एका विषयात पारंगत व्हायचे असले त्यावर आधारितच सर्व विषय असावेत.
*पहिल्या व दुसऱ्या वर्षी क्रीडा, नाटक, सामाजिक कार्य, उपक्रमांमधून सहभागी होण्यासाठी ८ मूल्ये द्यावीत.

Story img Loader