‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेतील प्राध्यापकांच्या रिक्त जागा पूर्णपणे भरण्यासाठी आणखी दशकभर तरी वाट पाहावी लागणार आहे.
आयआयटीमध्ये १० विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. पण, शिक्षकांच्या कमतरतेमुळे अनेक आयआयटीमध्ये सध्या हे प्रमाण १:१५ किंवा १:२० असे आहे. शिक्षक-विद्यार्थी संख्येचे हे आदर्श प्रमाण साध्य करण्यासाठी आयआयटींना आणखी १० वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे.
आयआयटीतील शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न उद्भवला तो २००६ साली. तोपर्यंत अनुसूचित जाती-जमातींप्रमाणे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता आयआयटी, एम्स, आयआयएम आदी केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये राखीव जागांची तरतूद नव्हती. २००६ साली तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुनसिंग यांनी इतर मागासवर्गीयांकरिता घटनात्मक तरतुदीनुसार २७ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या जागा ५० टक्क्यांहून कमी होणार असल्याने देशभर प्रचंड मोठय़ा प्रक्षोभाला सरकारला सामोरे जावे लागले.
हा राग शमविण्यासाठी सरकारने खुल्या वर्गासाठी त्यावेळी अस्तित्त्वात असलेल्या जागा कमी होऊ नये म्हणून सर्वच आयआयटीमधील एकूण जागांची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर नवीन आयआयटी सुरू करून जागांची संख्या आणखी वाढविली.
तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने प्रवेशक्षमता वाढविण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या वाढविणे कठीण होते. तरी सध्या मुंबई, दिल्ली, कानपूरसारख्या जुन्या आयआयटीमध्ये दरवर्षी सरासरी ३५ ते ४० नवीन शिक्षक नेमले जातात. पण, शिक्षकांच्या नियुक्तीचा हा वेग विद्यार्थीक्षमता ज्या वेगाने वाढते आहे त्या तुलनेत कमी आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांचे १:१० हे आदर्श प्रमाण साध्य करण्यासाठी आणखी १० वर्षांचा अवधी लागेल, असा अंदाज आहे. ‘आमच्याकडे असलेल्या शिक्षकांवर सध्या बराच ताण आहे. पण, शिक्षकांच्या दर्जाबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही,’ अशी प्रतिक्रिया रूरकी आयआयटीचे संचालक प्रदीप्तो बॅनर्जी यांनी व्यक्त केली.
बॅनर्जी यांच्या म्हणण्याला इतर संचालकांनीही दुजोरा दिला. ‘आयआयटीमध्ये रूजू होणाऱ्या शिक्षकांचा दर्जा सध्या फारच चांगला आहे. कारण, यापैकी अनेक शिक्षकांनी परदेशातून पीएचडी केलेले आहे,’ असे मुबंईच्या आयआयटीचे संचालक देवांग खक्कर यांनी सांगितले.
जुन्या आयआयटीतील अनेक शिक्षकांना परदेशात अध्यापनाचा व कामाचा अनुभव आहे.
शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न तुलनेत नव्या आयआयटींनी भेडसावत नाही. कारण, नवीन आयआयटी सुरू करतानाच शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. रोपार, मंडीसारख्या नव्याने सुरू झालेल्या आयआयटीमध्ये हे प्रमाण तुलनेत आदर्श म्हणजे १:२ असे आहे.

Story img Loader