राज्यात ४५ नव्या महाविद्यालयांना मान्यता देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबई विद्यापीठाअंतर्गत दोन तर औरंगाबाद विद्यापीठासाठी सर्वाधिक १० नव्या महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे. यामुळे दरवर्षी प्रवेशादरम्यान होणारा तिढा सुटण्याची शक्यता आहे.  
राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ३० ऑक्टोबर २०१० रोजी सादर झालेल्या प्रस्तावांची छाननी प्रक्रिया नुकतीच पूर्ण करत ४५ नव्या महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठासाठी ‘बीए इन क्युलिनरी आर्ट्स’च्या अभ्यासक्रमासाठी ‘बॉम्बे सबर्बन आर्ट्स अ‍ॅण्ड क्रॉफ्ट एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेच्या नव्या महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली असून त्याबरोबरच कांदिवली येथील ‘ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर अ‍ॅडव्हान्समेंट’ या महाविद्यालयालाही मान्यता देण्यात आली आहे.  मुंबई विद्यापीठाच्या या दोन नव्या महाविद्यालयांबरोबरच औरंगाबाद विद्यापीठासाठी १०, एसएनडीटी विद्यापीठासाठी ९, अमरावती विद्यापीठासाठी ७, रामटेक विद्यापीठासाठी २, गडचिरोली विद्यापीठासाठी ४, पुणे विद्यापीठासाठी ४, मराठवाडा विद्यापीठासाठी ५, सोलापूर, कोल्हापूर आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी प्रत्येकी एक अशा एकूण ४५ महाविद्यालयांना मान्यता दिल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या महाविद्यालयांनी भविष्यात कोणत्याही प्रकारचे अनुदान सरकारकडून मागता येणार नाही, या अटीवर ही मान्यता देण्यात आली आहे. तसेच मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा कुठल्याही परिस्थितीत जास्तीचे प्रवेश देऊ नये, अशी अटही महाविद्यालयांना पाळावी लागणार आहे.

Story img Loader