गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना दिलेली जुनी पुस्तके शाळेत ज्या-त्या वर्गात ठेवलेली आणि नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी. एका विद्यार्थ्यांसाठी दोन संच, असा प्रयोग उमरगा तालुक्यातील जवळगा बेट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका उषा गाडे-इंगळे यांनी सुरू केला आणि दप्तराचे ओझे कमी ही भानगडच संपली. या उपक्रमाचे शिक्षण विभागात कौतुक होत आहे.
प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके दिली जातात. वर्ष संपले की ती पुस्तके पुन्हा वापरात येत नाहीत. परंतु उषा गाडे-इंगळे यांनी जुनी पुस्तके विद्यार्थ्यांना जपून ठेवण्यास सांगितली. ती जुनी पुस्तके िडकाने व्यवस्थित चिकटवून त्याला कव्हर लावून त्याचे विद्यार्थीनिहाय संच तयार केले. चालू शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांना एक नवीन पुस्तकांचा संच व एक जुना पुस्तकांचा संच, असे दोन संच वाटप करण्यात आले. नवीन संच विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी घरी ठेवायचा व जुना संच शाळेतच वर्गात ठेवायचा, म्हणजे पुस्तकांची ने-आण करायचीच नाही. त्यामुळे पुस्तकांचे ओझे कमी झाले. तसेच गृहपाठ व वर्गपाठाच्या वह्यादेखील दररोज शाळेत आणू नये म्हणून सोमवार मराठी, मंगळवार इंग्रजी, अशा पद्धतीने एका विषयाला एक वार ठरविलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी फक्त दोन ते तीन वह्या व लेखन साहित्य एवढेच दप्तर घेऊन शाळेत येतात. दप्तराचे बिलकुल ओझे त्यांना वाटत नाही. या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे पालकही समाधानी आहेत. सध्या उषा गाडे-इंगळे या इयत्ता चौथीच्या वर्गशिक्षिका आहेत. या वर्गासाठी त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला आहे. आता पूर्ण शाळेत हा उपक्रम राबविण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख अर्जुन जाधव व मुख्याध्यापक अशोक साखरे यांनी त्यांचे अभिनंदनही केले आहे. या उपक्रमाविषयी बोलताना उषा गाडे म्हणाल्या, ‘एटीएफ (अ‍ॅक्टीव्ह टीचर्स फोरम) या शिक्षकांच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर चर्चा करताना मला या उपक्रमाची कल्पना सुचली आणि नियोजनबद्धपणे मी हा उपक्रम राबविला. आधी विद्यार्थी सर्व पुस्तके, सर्व वह्या, स्वाध्यायपुस्तिका दप्तरात घेऊन यायचे. दप्तराचे खूप ओझे व्हायचे. काहींना तर दप्तर पाठीवर अडकवतासुद्धा यायचे नाही. परंतु आता ओझे कमी झाल्याने विद्यार्थी खूश आहेत.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा