शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पालिकेकडून सुरू असलेल्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीत अवघ्या १२३१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. सोमवारी दुसरी फेरीची लॉटरी काढली जाणार असून २१ ते २७ एप्रिलपर्यंत प्रवेश दिले जातील. मात्र पहिल्या फेरीतील उर्वरित दोन हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.
आर्थिकदृष्टय़ा वंचित घटकातील मुलांसाठी शहरातील ३१३ शाळांमधील ११,८३७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी या जागांची संख्या ८३२४ होती. गेल्या वर्षीपेक्षा जागांच्या संख्येत वाढ होऊनही पालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. केवळ ४,०८९ मुलांचे अर्ज या जागांसाठी आले. त्यातील तीन हजार मुलांना पहिल्या फेरीत शाळांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली. मात्र या विद्यार्थ्यांच्या शुल्कासंबंधी प्रश्न उपस्थित करून शाळांनी मुलांना प्रवेश देण्याचे नाकारले. प्रवेशासाठी वाढवून दिलेली तीन दिवसांची मुदत शनिवारी संपली असून अवघ्या १२३१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. पहिल्या फेरीतील उर्वरित १८०० विद्यार्थ्यांचा प्रश्न अनुत्तरित आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश न देणाऱ्या शाळांची मान्यता काढून घेण्याची कारवाई राज्य सरकार करू शकते, असे पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षीही अनेक शाळांनी प्रवेश नाकारला होता.
मात्र या शाळांपैकी कोणावरही कारवाई झाली नाही. त्यामुळेच शाळांचे आडमुठेपणाचे धोरण कायम आहे, असे अनुदानित शिक्षण बचाव समितीचे सुधीर परांजपे यांनी सांगितले.

Story img Loader