चौथीच्या व सातवीची शिष्यवृत्तीची परीक्षा रविवारी राज्यभरात सुरळीत पार पडली. चौथीचे ९,२७,७८९ आणि सातवीचे ६,६७,६२५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. राज्यातील एकूण ९,३०९ परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत परीक्षा झाली.
दोन्ही परीक्षांच्या एकूण १५,९५,४१४ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १२,९२,७११ इतके विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत.
त्या खालोखाल इंग्रजी माध्यमाचे २,१४,४४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. उर्दुचे ६५,२०२, हिंदीचे १७,४४९, कन्नडचे ४,१९९, गुजराथीचे ११९३, तेलुगुचे २१४ आणि सिंधीचे ६ इतके विद्यार्थी परीक्षेला बसले.
या वर्षीपासून या परीक्षेकरिता प्रथमच ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून घेण्यात आले होते. तसेच, परीक्षेची ओळखपत्रेही ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली होती.
या वर्षी परीक्षार्थीच्या मागणीनुसार प्रथमच सेमी इंग्रजी माध्यमाकरिता वेगळ्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दुखापतग्रस्त विद्यार्थिनीची रुग्णवाहिकेत परीक्षा..
नाशिकमध्ये नेहा वऱ्हाडे या चौथीच्या मुलीने पायाला दुखापत झाली असतानाही जिद्दीने रुग्णवाहिकेत शिष्यवृत्तीची परीक्षा दिली.
नाशिकच्या सिडको येथील अभिनव बालशिक्षण मंदिरात नेहा वऱ्हाडे हिने परीक्षा दिली. तीन महिन्यांपूर्वी आईसोबत जात असताना रस्त्यावर तिला ट्रकची धडक बसली. त्यात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. शस्त्रक्रियाही करावी लागली. पण तिने या काळात अभ्यास सुरू ठेवला. रविवारी अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन नेहाने रुग्णवाहिकेत परीक्षा दिली.