चौथीच्या व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षार्थीची गेल्या पाच वर्षांत सुमारे एक-एक लाखाने कमी झालेली संख्या यंदा चौथीच्या परीक्षार्थीच्या संख्येत भर पडल्याने तब्बल ३० हजारांनी वाढली आहे. सातवीच्या परीक्षार्थीची संख्या मात्र १० हजाराने कमी झाली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा ऐच्छिक असल्याने शाळा व पालक विद्यार्थ्यांना किती प्रोत्साहन देतात यावर दरवर्षी परीक्षार्थीची संख्या अवलंबून असते. २००९ साली २१ लाख विद्यार्थी चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीला बसले होते, मात्र तेव्हापासून गेल्या वर्षीपर्यंत शाळा आणि विद्यार्थीसंख्या वाढूनही शाळांच्या निरुत्साहामुळे सुमारे एक-एक लाखाने परीक्षार्थीची संख्या घटत होती, परंतु यंदा चौथीचे परीक्षार्थी ३९,२३६ हजारांनी वाढले आहेत. सातवीचे परीक्षार्थी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ९,८६२ने कमी झाले आहेत, अशी माहिती या परीक्षेचे आयोजक ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’चे उपायुक्त राजेश क्षीरसागर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. १६ जानेवारीपर्यंत या परीक्षेकरिता अनुक्रमे ९,२९,९७५ आणि ६,६८,९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. अतिविलंब शुल्कासह परीक्षेकरिता ७ मार्चपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळे यात आणखी विद्यार्थ्यांची भर पडेल, अशी अपेक्षा परिषदेचे आयुक्त व्ही. बी. पायमल यांनी व्यक्त केली. आतापर्यंत तब्बल ११३ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षांकरिता नोंदणी केली आहे. चौथीच्या परीक्षेच्या स्वरूपात यंदा अभ्यासक्रमानुसार बदल करण्यात आला असून सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चौथीच्या पेपर २च्या वेळी आणि सातवीच्या पेपर २ व ३च्या वेळी मूळ माध्यमासह इंग्रजी माध्यमातूनही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा