विद्यार्थी आणि पालक मात्र हवालदिल
स्कूलबस नियमावली अस्तित्वात आली असली तरी त्याचे पालन बसचालक करीत आहेत की नाही, यावर सध्या कोणाचेच नियंत्रण नाही. शाळा बस चालकांच्या बेताल वागण्यावर र्निबध नसल्यानेच कांदिवलीमध्ये बुधवारी सकाळी एका शाळकरी मुलाला नाहक जीव गमवावा लागला. पण प्रभावी अंमलबजावणीअभावी आज या नियमावलीची अवस्था दात नसलेल्या वाघासारखी झाली आहे.
गौतम नायडू हा पाच वर्षांचा मुलगा आपल्या आईसमवेत कांदिवलीच्या मयूर टॉकिजजवळील रस्त्यावरून जात होता. तो ज्या रस्त्याने जात होता तो एकमार्गी रस्ता होता. पण, नेमक्या उलट दिशेने आलेली एका भरधाव बस या दोघांच्या अंगावरूनच गेली. बसची धडक इतकी जबरदस्त होती की गौतमचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या आईलाही अपघातात जबर मार बसला आहे. बेफामपणे हाकली जाणारी ही बस कांदिवलीतीलच एका शाळेची होती. वाहतुकीच्या नियमांची तमा न बाळगणाऱ्या अशा वाहनचालकांना शाळेच्या बस चालविण्याचे काम तरी कसे मिळते, असा प्रश्न आहे.
‘पालक शिक्षक संघटने’च्या अरूंधती चव्हाण यांनी या गोंधळाला बसचालकांबरोबरच शाळा, संस्थाचालक, शिक्षकांनाही दोषी ठरविले आहे. ‘आज शाळेच्या अनेक बस राज्याबाहेरून येणारे चालक चालवितात. त्यांच्याकडे ना धड वाहन परवाना असतो ना धड गाडी चालविण्याचे प्रशिक्षण. अशा वाहनचालकांकडे शाळांच्या बसेसची जबाबदारी दिली जात असेल तर आपण आपल्या मुलांना दररोज मोठय़ा संकटात टाकतो आहोत,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
नियम धुडकावणाऱ्या अशा बसचालकांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्याने बसचालकांची मनमानी कायम आहे, अशी तक्रारही चव्हाण यांनी केली. या तक्रारीला दुजोरा देताना एक सक्रिय पालक स्मृती जोंधळे म्हणाल्या, ‘तक्रार करण्यासाठी आरटीओकडे गेल्यास ते स्थानिक पोलिसांकडे बोट दाखवितात. शिक्षक तर शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर मुलांची जबाबदारी आपली नाही, असे सांगून हात झटकून मोकळे होतात. अशा परिस्थितीत नोकरदार आईवडिलांना बसचालकांचे मनमानी वागणे चालवून घेण्याशिवाय गत्यंतर नसते.’
कांदिवलीच्या अपघातातील बस ज्या शाळेची होती त्या ‘सरदार वल्लभभाई पटेल शाळे’ने अपघाताची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, येथील स्थानिक नगरसेविका गीता यादव यांनी पोलिस ठाण्यात शाळाबसचालकाविरोधात तक्रार दाखल केली. या भागातील शाळाचालकांची स्कूलबस नियमावलीवर बैठक घेण्याचा विचार असल्याचे यादव यांनी सांगितले.
न्यायालयात प्रलंबित
स्कूलबस नियमावलीला शाळा बसचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परंतु, सुरवातीला झालेल्या तीन-चार सुनावण्यांनंतर आजपावेतो यावर सुनावणी झालेली नाही. या नियमावलीच्या अंमलबजावणीला न्यायालयाची स्थगिती नाही. मात्र, न्यायालयात प्रलंबित असल्याने ना धड आरटीओ अधिकारी ती गांभीर्याने राबवित आहेत ना शाळाबसचालक त्याला महत्त्व देत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा