पूर्व यादीतून गायब झालेली नावे.. नावांमधील चुका.. प्रवेशपत्रांमधील गोंधळ या सर्व पाश्र्वभूमीवर १०वीच्या परीक्षेत अडचणी येतात की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र सुदैवाने तसे काहीही न होता पहिल्या दिवशीची मराठीची परीक्षा सुरळीत पार पडल्यामुळे सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासंदर्भात अडचण येईल अशांना आयत्या वेळी प्रवेशपत्र देण्याची सुविधा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागाने केली होती. याचा फायदा माणगाव आणि मुंब्रा येथील परीक्षा केंद्रांवरील दोनच विद्यार्थ्यांना घ्यावा लागल्याचे मुंबई विभागाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर केंद्रावर पोहोचून परीक्षा दिल्याने परीक्षाही सुरळीत पार पडल्याचे ते म्हणाले. परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून मंडळाने रविवारी मुख्याध्यापकांची बैठक घेतली होती.
दरम्यान, दोन विद्यार्थ्यांना दोन परीक्षा केंद्रे आल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला होता, मात्र शाळेशी संपर्क साधल्यानंतर त्यांनाही वेळेवर योग्य त्या परीक्षा केंद्रावर पोहोचता आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मदत क्रमांकांवर आतापर्यंत २०९३ विद्यार्थ्यांचे फोन आले असून, परीक्षेच्या पहिल्या दिवशी १४७ फोन आल्याचे मंडळाने सांगितले. या विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेवर होणार का, प्रवेशपत्राबद्दलची माहिती, केंद्राचा पत्ता आदींची माहिती विचारली जात असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा