ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये दिले जाणारे संगणक शिक्षण प्रभावी व्हावे यासाठी मराठी भाषेतून शिक्षकांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम ठाण्यातील ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या वतीने राबविण्यात येत आहे. वेळणेश्वर येथील संस्थेच्या ‘महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या संगणक कक्षात हे प्रशिक्षण दिले जाते. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जातो.
विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख व्हावी, त्या आधारे शिकता यावे यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्था विविध योजनांखाली शाळांना मोफत संगणक देतात. परंतु, संगणकाच्या वापराविषयी असलेल्या अज्ञानामुळे शाळांमधून अध्यापन किंवा प्रशासकीय कामांसाठी त्यांचा वापर केला जात नाही. अनेक शाळांमध्ये संगणक वापराविना धूळ खात पडून असतात. काही ठिकाणी त्यांची दुरुस्ती वेळेत न झाल्याने त्यांची काम करण्याची क्षमता संपून गेलेली असते.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमधील ९० टक्के शाळांमध्ये मराठी माध्यमातून शिकविले जाते. त्यामुळे संगणक वापराचे प्रशिक्षणही मराठीतून दिले जाणे आवश्यक बनले आहे. परंतु, मराठी प्रोग्रॅम आणि या मार्गदर्शक उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागात संगणक तंत्रज्ञान फारसा प्रभाव पाडू शकलेले नाही. ही त्रुटी लक्षात घेऊन आम्ही शिक्षकांना मराठीतून संगणक वापराचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे ‘विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी सांगितले.
संस्थेने यासाठी मराठीतून अभ्यासक्रम तयार केला असून त्यावर आधारित पुस्तके छापून ती प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना मोफत दिली जातात. रत्नागिरीतील सुमारे १०० शिक्षकांनी आतापर्यंत हे प्रशिक्षण घेतले आहे. संस्थेच्या संगणक कक्षात ८० संगणक आहेत. त्या आधारे प्रशिक्षण दिले जाते. तीन दिवसांच्या प्रशिक्षणात एक दिवस ‘आकाश’ टॅबलेटचा वापर अध्यापनासाठी कसा करायचा हे शिकविले जाते. त्यासाठी आयआयटीच्या वरिष्ठ संशोधक डॉ. माधुरी सावंत यांचे सहकार्य संस्थेला लाभले आहे. प्रशिक्षणाबरोबरच तीन दिवसांचा शिक्षकांचा राहण्याचा, जेवणाचा खर्च संस्था करते. संस्थेला यासाठी प्रत्येक शिक्षकामागे पाच हजार रुपये खर्च येतो.
संपर्क – http://www.vpmthane.org
http://www.vpmmpcoe.org
शिक्षकांना विशेष संगणक प्रशिक्षण
ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये दिले जाणारे संगणक शिक्षण प्रभावी व्हावे यासाठी मराठी भाषेतून शिक्षकांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम ठाण्यातील ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या वतीने राबविण्यात येत आहे. वेळणेश्वर येथील संस्थेच्या ‘महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या संगणक कक्षात हे प्रशिक्षण दिले जाते.
First published on: 19-01-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special computer training to teacher