दहावीच्या परीक्षेला गालबोट लावणाऱ्या कांदिवली पेपरफुटीप्रकरणी तपास समितीचा अहवाल अखेर बुधवारी सादर झाला. मात्र पेपरफुटी कशी व कोठून झाली याची माहिती त्यातून बाहेर आलेलीच नाही. ही पेपरफुटी केवळ एकाच विद्यार्थ्यांपुरती मर्यादित होती, असा निष्कर्ष अहवालात नोंदविण्यात आला आहे.
कांदिवलीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्यांकडे कॉपी करताना बीजगणिताचे दोन पेपरसंच सापडले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी बोर्डाकडून तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती मागील शनिवारी अहवाल सादर करणार होती. नंतर त्यासाठी मंगळवारी मुहुर्त मुक्रर करण्यात आला. प्रत्यक्षात अखेर बुधवारी अहवाल सादर झाला. या अहवालात पेपरफुटीचे कारण आणि स्रोत सापडलेला नाही. समितीला तपासात अनेक मर्यादा असल्याचे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले आहे.
समितीने तब्बल ७८ केंद्रांची चौकशी करून हा अहवाल सादर केला आहे. कॉपी करताना विद्यार्थ्यांकडे ‘क’ संच आढळला होता. या संचांतील उर्वरीत प्रश्नपत्रिकांचा हिशेब समितीने तपासला. मात्र काही शाळा ग्रंथालयासाठी तसेच काही शिक्षक पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी नमुना म्हणून प्रश्नपत्रिका काढून ठेवत असतात. यामुळे या संचांचा हिशेब लावून नेमकी कोणत्या केंद्रातून ही प्रश्नपत्रिका बाहेर पडली हे शोधणे कठीण होते. तसेच समिती शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना पोलिसांप्रमाणे चौकशीसाठी बोलावू शकत नाही. यामुळेही तपास करताना खूप मर्यादा आल्याचे समजते.
समितीने मंडळाची सध्याची प्रक्रिया सुधारण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. याचबरोबर पोलीस तपासासाठी काही शिफारशीही केल्या आहेत.
समितीने मंडळाला केलेल्या सूचना
१. प्रश्नपत्रिकांवर छापील क्रमांक असावा. म्हणजे कोणत्या केंद्रात कोणत्या प्रश्नपत्रिका पोहोचल्या आहेत हे कळू शकेल.
२. केंद्रांनी संबंधितांकडे प्रश्नपत्रिका जमा करताना त्या संपूर्ण परीक्षा संपल्यावर एक दिवसानंतर जमा कराव्यात. यामध्ये जर एखादी प्रश्नपत्रिका शाळांनी संदर्भासाठी बाजूला ठेवली असेल तर शाळांनी तसे पत्र द्यावे असेही सांगण्यात आले आहे.
३. शहरी भागात पाच हजार विद्यार्थ्यांच्या मागे एक कस्टोडियन द्यावा.
समितीने पोलिसांना तपासासाठी दाखवलेली दिशा
१. पोलिसांनी तपास करताना कॉपी कुणी लिहून दिली त्याचे अक्षर पडताळून पाहावे.
२. विद्यार्थ्यांचे तसेच इतर संशयितांचे मोबाइलचे कॉल रेकॉर्ड तपासावे.
३. विद्यार्थ्यांने सर्वप्रथम केलेल्या ‘मला माझ्या वडिलांनीच प्रश्नपत्रिका दिली’ या जबाबाच्या आधारेच तपास करावा.