दहावी परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेपर्यंत मिळण्याची शक्यता नाही, अशा विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेशपत्र देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
दहावीची परीक्षा सोमवार तीन मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षा दोन दिवसांवर आली असून मुंबईतील काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळालेली नाहीत. प्रवेशपत्रांमधील चुकांमध्ये दुरूस्ती करण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देऊन मंडळाने हा प्रश्न जरी मार्गी लावला असला तरी ज्यांची ओळखपत्रेच छापलेली नाहीत, असे काही विद्यार्थी असावे, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी स्वत:च्या अधिकारात तात्पुरते प्रवेशपत्र उपलब्ध करून द्यावे, असा सूचना ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या मुंबई येथील विभागीय मंडळाने
दिले आहेत.
त्यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाशी दूरध्वनीवर संपर्क साधून आपला बैठक क्रमांक मिळवायचा आहे. हा बैठक क्रमांक, विद्यार्थ्यांचे नाव, परीक्षा केंद्र क्रमांक आणि परीक्षार्थीचे छायाचित्र हा तपशील शाळेच्या अधिकृत पत्रावर (लेटरहेड) सत्यप्रत करून त्याचा प्रवेशपत्र म्हणून वापर करावा, असे शाळांना कळविण्यात आले आहे. ‘एकही विद्यार्थी प्रवेशपत्राविना परीक्षेपासून वंचित राहू नये, म्हणून आम्ही ही सोय केली आहे,’ असे मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे यांनी सांगितले.
इतके करूनही एखादा विद्यार्थी प्रवेशपत्राविना असल्यास किंवा एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक संबंधित विद्यार्थ्यांला सहकार्य करीत नसल्यास त्यांच्यासाठी मंडळ वेगळी व्यवस्था करणार आहे. मात्र, ही व्यवस्था काय असेल त्याची माहिती रविवारी देऊ, असे पांडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘मिसिंग’ प्रवेशपत्रांची मागणी नोंदविण्यासाठी शाळांच्या प्रतिनिधींनी शनिवारीही मंडळाच्या कार्यालयात गर्दी केली होती. शनिवापर्यंत साधारणपणे तीन हजार विद्यार्थ्यांना मुंबई विभागीय कार्यालयातर्फे प्रवेशपत्रांचे वाटप करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेशपत्रे मिळालेली नाहीत, त्यांच्याकरिता रविवारीही कार्यालय सुरू असणार आहे. दरम्यान दादरच्या डिसिल्व्हा शाळेतील मंडळाच्या केंद्रावर शाळांना बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा