शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध
फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत तर दहावीची परीक्षा १ ते २९ मार्च या कालावधीत पार पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी सर्व वेळापत्रक त्यांच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अद्ययावत केले आहे. यामुळे यंदाही मंडाळाच्यावतीने राज्यातील नऊ विभागांमध्ये या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यंदा हे वेळापत्रक जाहीर करण्यात दरवर्षीपेक्षा उशीर झाल्याने शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते.
बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा नाही
ज्याप्रमाणे राज्य शासनाने राज्य सीईटीची मागणी मान्य केली. त्याचप्रमाणे विज्ञानाच्या सर्व विषयांची परीक्षा दोन भागांत घ्यावी अशीही मागणी होती. मात्र ही मागणी मान्य न केल्याचे वेळापत्रकावरून स्पष्ट होते. यापूर्वी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र या सर्व विषयांच्या दोन भागांची परीक्षा स्वतंत्र होत होती. २०१३ पासून दोन्ही भाग एकाच प्रश्नपत्रिकेत घेतले. यामुळे विद्यार्थी तसेच शिक्षकांवर ताण येत आहे. यामुळे या विषयांची परीक्षा पूर्वीप्रमाणेच घेण्यात यावी अशी शिक्षक संघटनेचे मागणी होती. याउलट दहावीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाच्या दोन्ही भागांची परीक्षा दोन स्वतंत्र दिवशी घेतली जाणार आहे.
छापील वेळापत्रकच अंतिम..
हे वेळापत्रक केवळ माहितीसाठी आणि अभ्यासाच्या नियोजनासाठी असून लेखी परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम राहील, असेही मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक मंडळातर्फे परीक्षेपूर्वी स्वतंत्रपणे दिले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Story img Loader