दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असलेले शिक्षक आणि विक्रीकर अधिकारी व साहाय्यक विक्रीकर आयुक्त यांना पर्यायी कर्मचारी रुजू झाल्यावर निवडणुकीच्या कामातून वगळण्याची मुभा देण्याचा निर्णय राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे दहावी व बारावीचे निकाल वेळेवर लागणार असून त्यात निवडणुकीच्या कामांमुळे विलंब होणार नाही.
दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम असलेल्या शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्यात आल्याने निकालांना तीन-चार आठवडे विलंब लागण्याची शक्यता होती. हे निकाल वेळेवर जाहीर व्हावेत, यासंदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही आहेत. त्यामुळे या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट देण्याची विनंती शालेय शिक्षण विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. पहिली ते नववीचे सहा लाख शिक्षक उपलब्ध असून त्यांच्या बदल्यात उत्तरपत्रिका तपासणीचे काम असलेल्या शिक्षकांना वगळता येईल, असा प्रस्ताव शिक्षण विभागाने दिला होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी नियुक्ती झाल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे पत्र दिल्यावर आणि बदली कर्मचारी रूजू झाल्यावर या शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त केले जाईल, असे उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अ.ना. वळवी यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
राज्याच्या महसूल संकलनात महत्त्वाची जबाबदारी विक्रीकर अधिकारी आणि सहाय्यक विक्रीकर आयुक्त यांच्यावर असते. या हजारो कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात आल्याने त्याचा परिणाम राज्याच्या महसुलावर होण्याची शक्यता होती. त्यामुळे विक्रीकर निरीक्षक अतिरिक्त उपलब्ध करून देऊन त्या बदल्यात विक्रीकर अधिकारी आणि साहाय्यक आयुक्त यांना निवडणूक कामातून वगळावे, असा प्रस्ताव विक्रीकर विभागाने आयोगाकडे पाठविला होता. त्याला आयोगाने हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र बदली कर्मचारी रूजू झाल्यावरच या अधिकाऱ्यांना निवडणूक कामातून सूट मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा