दररोज होणारी प्रात्यक्षिके, हजेरीचे कडक नियम, बायफोकलच्या मर्यादित जागा, गणित किंवा जीवशास्त्राला भूगोल, मानसशास्त्रसारखा ‘स्कोरिंग’ विषय निवडण्याला असलेल्या मर्यादा अशा अनेक बाबी विद्यार्थ्यांचा नामवंत महाविद्यालयांकडील ओघ आकुंचित पावण्यास कारणीभूत ठरत आहे. मात्र नेमक्या याच गोष्टींमध्ये लवचिकता आणल्याने जेईई, नीट आदी स्पर्धा परीक्षांमध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा कोचिंग क्लासेसशी ‘टायअप’ केलेल्या टपरीबाज कनिष्ठ महाविद्यालयांकडे वळविला आहे.
खरेतर नामांकित महाविद्यालयांकडे सुसज्ज प्रयोगशाळा, मोठे वर्ग, अध्यापक यांची वानवा तर बिलकुलच नाही. सरकारचे अनुदान असल्याने शुल्कही नाममात्रच मोजावे लागते. तुलनेत एखाद्या पालिकेच्या शाळेत किंवा एखाददुसरा मजला घेऊन चालविल्या जाणाऱ्या ‘टायअप’वाल्या टपरीबाज महाविद्यालयात २५ ते ३० हजार रुपये शुल्क मोजून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांनी कोचिंग क्लासेसच्या मदतीने भरविलेला जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांच्या बाजार. विद्यार्थ्यांना बारावीच्या बरोबरीने या स्पर्धा परीक्षांचीही तयारी करता यावी या करिता अनुकूल वातावरण अशा टपरीबाज महाविद्यालयांमधून उपलब्ध करून दिले जाते.
पहिली अनुकूलता हजेरीबाबतच्या नियमांची. नामांकित महाविद्यालयांमध्ये दर दिवशी प्रात्यक्षिकांकरिता हजेरी लावावी लागते. पण, टपरीबाज महाविद्यालयांध्ये प्रात्यक्षिकांचा ‘आठवडी बाजार’ एकाच दिवशी भरतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना उरलेले दिवस पूर्णवेळ क्लासेसना बसता येते.
दुसरे कारण विषयांच्या निवडीबाबत असलेल्या लवचिकतेचे. ज्यांना वैद्यकीय प्रवेशामध्ये रस आहे त्यांना गणित नको असते. तर अभियांत्रिकीवाल्यांना जीवशास्त्रात रस नसतो. कारण, या दोन्ही विषयाच्या अभ्यासात तुलनेत जास्त प्रयत्न आणि वेळ द्यावा लागतो. पण, टपरीबाज महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार भूगोल, मानसशास्त्र, इतिहास असे तुलनेत सोप्या विषयांचे पर्याय निवडण्याची मोकळीक मिळते. अनुदानित महाविद्यालयात मात्र या विषयांच्या निवडीला मर्यादा आहेत. बायफोकल या स्कोरिंग विषयांच्या जागाही नामांकित महाविद्यालयाप्रमाणे मर्यादित नसल्याने ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांला मिळण्याची सोय असते.
(क्रमश:)
टपरीबाज ‘लवचिक’ ‘नामांकित’ आकुंचित!
दररोज होणारी प्रात्यक्षिके, हजेरीचे कडक नियम, बायफोकलच्या मर्यादित जागा, गणित किंवा जीवशास्त्राला भूगोल, मानसशास्त्रसारखा ‘स्कोरिंग’ विषय निवडण्याला असलेल्या मर्यादा अशा अनेक बाबी विद्यार्थ्यांचा नामवंत महाविद्यालयांकडील ओघ आकुंचित पावण्यास कारणीभूत ठरत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-07-2014 at 12:46 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students avoid big colleges due to attendance and other restriction