मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनाविरोधात विद्यार्थ्यांनी आज, बुधवारी ‘विद्यापीठ बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये विद्यापीठातील अनेक विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हातेकर यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी करत सकाळी ८.३० पासूनच विद्यार्थी विद्यापीठाच्या कलिना येथील मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थी ठाण मांडून बसतील. निलंबनाविरोधात विद्यार्थी राज्यपालांचीही भेट घेणार आहेत.
प्रसारमाध्यमांतून विद्यापीठाच्या गैरकारभारावर टीका केल्यामुळे कुलगुरू राजन वेळुकर यांनी डॉ. हातेकर यांना ४ जानेवारी रोजी निलंबित केले.कोणतीही पूर्वसूचना किंवा ‘कारणे दाखवा’ नोटीस न देता हातेकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. हातेकर यांच्यासारख्या अभ्यासू व विद्यार्थीप्रिय प्राध्यापकावर झालेल्या या एकतर्फी कारवाईमुळे विद्यापीठातील वातावरण सध्या बरेच तापले आहे. डॉ. हातेकर यांचे निलंबन रद्द करण्यासाठी केवळ अर्थशास्त्रच नव्हे तर इतर विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांनीही सोमवारी विद्यापीठाच्या कलिना संकुलात उत्स्फूर्तपणे निदर्शने केली होती. विद्यार्थ्यांनी या संदर्भात कुलगुरू राजन वेळुकर यांना पत्र लिहिले असून त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीला कुलगुरूंनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी ‘विद्यापीठ बंद’ची हाक देत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोशल मीडियावरही मोर्चेबांधणी
विद्यार्थ्यांनी फेसबुकवर ‘एमयूस्टुडंट्स फॉर डॉ. हातेकर’ नावाचे पान तयार करून सोशल मिडियाच्या माध्यमातूही हातेकर यांच्या निलंबनाविरोधात विद्यार्थ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. इतर संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असा प्रयत्न केला जाणार आहे. निलंबन कारवाईविरोधात विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापीठात सह्य़ांची मोहीमही राबवली. यात वेगवेगळ्या विभागाच्या ३०० विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून निषेध व्यक्त केला.
विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
* हातेकर यांच्यावरील कारवाई अयोग्य असून वैयक्तिक असुरक्षितता व द्वेषभावनेपोटी करण्यात आली आहे.
* केवळ मुंबई विद्यापीठच नव्हे तर एकूणच उच्चशिक्षणाचा घसरता दर्जा हा सरांच्या चिंतेचा विषय आहे. त्या प्रश्नावर त्यांनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर आपले मत मांडले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे.
*डॉ. हातेकर इकॉनॉमॅट्रिक्स, गेम थिअरी आणि मायक्रो इकॉनॉमिक्स हे विषय विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यांना अचानक निलंबित करण्यात आल्याने आमचे हे विषय कोण घेणार?
मी खुल्या मनोवृत्तीचा असून मला या प्रकरणी दोन्ही बाजू जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी विद्यापीठाचे अधिकारी आणि हातेकर या दोघांनाही चर्चेला बोलावणार आहे.
– राजेश टोपे , उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
टोपे डॉ. हातेकर यांची बाजू ऐकणार
मुंबई विद्यापीठाने कोणतीही पूर्वसूचना न देता डॉ. नीरज हातेकर त्यांच्यावर तडकाफडकी कारवाई केली असली तरी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी डॉ. हातेकर यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, डॉ. हातेकर यांच्या निलंबनाचा वाद आता सरकारदरबारी पोहोचला आहे. ‘मी अत्यंत खुल्या मनोवृत्तीचा असून मला या प्रकरणी दोन्ही बाजू जाणून घ्यायच्या आहेत. त्यामुळे मी विद्यापीठाचे अधिकारी आणि हातेकर या दोघांनाही चर्चेला बोलावणार आहे,’ असे टोपे यांनी सांगितले.
सोशल मीडियावरही मोर्चेबांधणी
विद्यार्थ्यांनी फेसबुकवर ‘एमयूस्टुडंट्स फॉर डॉ. हातेकर’ नावाचे पेज तयार करून सोशल मिडियाच्या माध्यमातूही डॉ.हातेकर यांच्या निलंबनाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. इतर संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असा प्रयत्न केला जाणार आहे.
सह्यंची मोहीम
डॉ.हातेकर यांच्या निलंबनाविरोधात मंगळवारी विद्यापीठात सह्य़ांची मोहीम राबविण्यात आली. यात वेगवेगळ्या विभागाच्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वाक्षरी करून आपला निषेध व्यक्त केला.
विद्यापीठातील शिक्षकांचा प्राध्यापक हातेकर यांना वाढता पाठिंबा
आमचे नैतिक कर्तव्य
डॉ.हातेकर यांच्यासारख्या अभ्यासू प्राध्यापकाच्या बाजूने उभे राहणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे, कुलगुरूंनी त्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी आमची विनंती आहे.
– प्रा. विभा सुराणा, जर्मन भाषा विभागप्रमुख
सल्लामसलत हवीच!
अर्थशास्त्र विभाग स्वायत्त आहे. विद्यापीठाने डॉ. हातेकर यांच्यावर अशी थेट कारवाई करण्याऐवजी विभागाच्या व्यवस्थापन आणि शिक्षण मंडळाशी तरी किमान सल्लामसलत करायला हवी होती.
– रितू दिवाण, संचालक, अर्थशास्त्र विभाग
कुलगुरूंकडून विशेषाधिकारांचा गैरवापर
डॉ. हातेकर यांच्यावर कारवाई करताना कुलगुरूंनी आपल्या विशेषाधिकारांचा गैरवापर केला आहे. खुद्द कुलगुरू राजन वेळुकर यांची नियुक्तीच वादग्रस्त आहे. त्यांच्यासंदर्भातील कितीही कुलंगडय़ा बाहेर आल्या तरी राजकीय पाठिंबा आणि संरक्षण यामुळे ते त्यातून सहीसलामत सुटतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. २००९ला मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी निवड प्रक्रिया राबविली जात होती त्यावेळेस अनेक ज्येष्ठ, अनुभवी आणि अभ्यासू उमेदवारांचे अर्ज धुडकावून वेळुकर यांच्या अर्जाचा विचार केला गेला. त्यातच सर्वकाही आले.
– डॉ.आर.रामचंद्रन, संस्थापक सचिव, असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपल्स अॅण्ड प्रोफेसर्स ऑफ पॉलिटिकल सायन्स