अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार..
दहावीप्रमाणेच बारावीसाठीही जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याच्या घोषणा या वर्षी तरी कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत. बारावीला असलेल्या विषयांची जास्त संख्या आणि विद्यापीठांची वेगवेगळी वेळापत्रके यामुळे बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वायाच जाणार आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी विषयांची संख्या जास्त असते. द्विलक्ष्यी अभ्यासक्रमही असतो. बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांबरोबरच मोठा विद्यार्थी वर्ग पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेत असतो.
बारावीनंतरच्या पुढील शिक्षणाचे नियंत्रण हे विद्यापीठाच्या पातळीवरून होत असते. मात्र, राज्यातील विद्यापीठांची वेळापत्रके, सत्रांची वर्गवारी, प्रवेश प्रक्रियेची पद्धत यामध्ये एकसंधता नाही. त्यामुळे बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी विद्यापीठांच्या नियमांमध्येही काही बदल करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थाना कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश द्यावेत याचे निकषही निश्चित होण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती राज्यमंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
मात्र, ही प्रक्रिया मोठी असून ती अद्याप सुरूही झालेली नाही. त्यामुळे आता बारावी अनुत्तीर्णासाठी ऑक्टोबर परीक्षेचाच पर्याय पुढील वर्षीही असणार आहे. त्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाण्यापासून दिलासा मिळणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. शिक्षण मंत्र्यांनी याबाबत केलेली घोषणा कागदावरच राहिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा