वर्गखोल्या, प्रयोगशाळा, वसतिगृहे, वाचनालये, पुरेसे शिक्षक यांचा अभाव असूनही बिनबोभाटपणे सुरू असलेल्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या व्यावसायिक महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश विद्यापीठांचे कुलपती व राज्यपाल विद्यासागर राव कुलगुरूंना दिले आहेत.
राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची वार्षिक बैठक मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्य़ाद्री अतिथिगृहात पार पडली. त्यावेळी राज्यपालांनी या सूचना दिल्या. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात मोठय़ा संख्येने व्यावसायिक महाविद्यालये सुरू आहेत. परंतु, या बहुतांश महाविद्यालयांमध्ये चांगल्या सुविधा नाहीत. शिक्षक नेमण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशी अभावग्रस्त महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत. अशा महाविद्यालयांचे नियमन आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार महाविद्यालयांना आहेत. आणि राज्यातील उच्चशिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी विद्यापीठांनी आपल्या अधिकारांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केली.
या शिवाय प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मेक इन महाराष्ट्र’ उपक्रम राबवायचा तर विद्यापीठांना महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागेल, असेही कुलगुरूंनी सांगितले.
भारतातील संशोधक, प्राध्यापक परदेशांमधील नामवंत विद्यापीठांमध्ये अध्यापन करीत आहेत. विद्यापीठांनी अशा तज्ज्ञांना मानद प्राध्यापक म्हणून ‘महाराष्ट्रात शिकवा’ या प्रकल्पाअंतर्गत निमंत्रित करावे.
तसेच, इतर राज्यातील व परदेशी विद्यार्थ्यांना ‘महाराष्ट्रात शिका’ प्रकल्पाअंतर्गत निमंत्रित करावे, अशी सूचना त्यांनी केली.

Story img Loader