वर्गातील चार भिंतींमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात. अभ्यासक्रमास आवश्यक असलेले प्रकल्प करतात आणि उत्तीर्ण झाले की थेट कंपन्यांमध्ये रुजू होतात. पण त्यांना कंपन्यांच्या विश्वाची अजिबात ओळख नसते. ही ओळख करून देण्यासाठी मुंबई आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘टिन्केर्स’ नावाची एक प्रयोगशाळा सुरू केली आहे. या माध्यमातून अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांंना कंपन्यांमधील नवनवीन तंत्रज्ञानांची ओळख होऊ शकणार आहे. तर काही तंत्रज्ञान विकसित करण्याची संधीही या प्रयोगशाळेत मिळणार आहे.
या प्रयोशाळेचे उद्घाटन केंद्र सरकारचे प्रधान विज्ञान सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांच्या हस्ते झाले. ‘टिन्केर्स’ प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक शैक्षणिक व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना नवनवीन सिस्टिम्स विकसित करण्याची संधीही याद्वारे मिळू शकेल, असे मत डॉ. चिदंबरम यांनी यावेळी व्यक्त केले. ही प्रयोगशाळा आयआयटी मुंबईतून १९७५ साली उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या निधीतून तयार केली आहे.
अमेरिका आणि युरोपमधील अभियांत्रिकीचे विद्यार्थी लहान वयातच उद्योगांमधील अधिक चांगले अनुभव घेऊ शकतात. यातूनच स्टीव्ह जॉब्ज आणि मार्क झुकेरबर्गसारखी मंडळी तयार झाली आहेत. हेच अनुभव आपल्या देशातील विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून ही प्रयोगशाळा तयार केल्याचे १९७५मध्ये उत्तीर्ण झालेले आणि अमेरिकेत स्वत:चा व्यवसाय करणारे हेमंत कनाकिया यांनी यावेळी स्पष्ट केले.