राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (१४ डिसेंबर) होणार असून यावर्षी ४ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. ठाण्यातील सात परीक्षा केंद्रांमध्ये आयत्यावेळी बदल झाल्यामुळे या ठाण्यातील विद्यार्थ्यांचा मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशी गोंधळ उडाला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात आला असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी या परीक्षेचा प्रतिसाद कमी झाला असला, तरी राज्यातील ४ लाख १४ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिली ते पाचवीच्या गटासाठी भाग १ आणि सहावी ते आठवीच्या गटासाठी भाग २ अशी दोन भागांत ही परीक्षा होणार आहे. पहिल्या भागाच्या परीक्षेसाठी २ लाख ६० हजार ६१८ उमेदवारांनी नोंदणी केली आहे, तर दुसऱ्या भागासाठी १ लाख ५४ हजार २०० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. मराठी, इंग्रजी आणि उर्दू अशा तीन माध्यमांमध्ये ही परीक्षा होणार आहे.
राज्यात १ हजार ३६२ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेचे हे दुसरे वर्ष असून यावर्षीपासून कला शिक्षकांना यातून वगळले आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या भागाची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पहिल्या भागाची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे नसल्याचेही स्पष्टीकरण परिषदेने केले आहे. त्यामुळे नोंदणीपेक्षा प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कॅमेऱ्याची नजर
परीक्षेसाठी प्रथमच परभणीतील प्रत्येक केंद्रावर व्हिडिओ कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. केंद्र, परिसराचे चित्रीकरण केले जाणार असल्यामुळे गरप्रकारांना आळा बसणार आहे. समन्वयक अधिकाऱ्यांनाही प्रत्येक केंद्राला वारंवार भेटी देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिल्या आहेत.