दहावीत सर्वाधिक विद्यार्थ्यांची ‘विकेट’ काढणारा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या गणिताचे ‘प्रमेय’ यंदा सुटल्याने या विषयाचा निकाल चांगलाच उंचावला आहे. गेल्या वर्षीपर्यंत ७५ टक्क्य़ांच्या आसपास असलेल्या गणिताच्या निकालाने यंदा चांगलीच उसळी घेत तब्बल ९० टक्के विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. गणिताच्या निकालाने एकदम १५ टक्क्य़ांहून अधिक घेतलेली उडी अनेकांना कोडय़ात टाकणारी ठरली आहे. गणिताचा हा निकाल तुलनेत ‘सोपा’ समजल्या जाणाऱ्या ‘सामान्य गणिता’पेक्षाही खूप जास्त आहे हे विशेष. कारण, सामान्य गणित आल्यापासून गणिताचा निकाल हा तुलनेत कमीच राहिला आहे.
‘गणितासाठी अंतर्गत मुल्यांकन म्हणून १०० पैकी २० गुणांसाठीची परीक्षा शाळा स्तरावरच घेण्यात आली होती. म्हणजे लेखी परीक्षा ही केवळ ८० गुणांसाठीच झाली. त्यातून अभ्यासक्रमही कमी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना गणितात उत्तीर्ण होण्याइतपत कामगिरी करणे शक्य झाले,’ अशी प्रतिक्रिया पुण्यातील एका गणिताच्या शिक्षिकेने व्यक्त केली. ‘यावेळी गणिताचा पेपर तुलनेने सोपा होता. त्याचप्रमाणे यावर्षी भूमितीच्या अभ्यासक्रमातून कॉन्व्हर्स प्रमेयांचा मुलांना कठीण जाणारा भाग वगळण्यात आला होता. त्यामुळेच निकाल मोठय़ा प्रमाणावर वाढलेला दिसतो आहे,’ अशी प्रतिक्रिया पुण्याच्या अहिल्यादेवी प्रशालेच्या अपर्णा गरूड यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा