‘मुक्ता’ची मागणी

प्राध्यापकांचे वेतन वेळेत न देणाऱ्या राज्यातील खासगी अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र व व्यवस्थापन महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी मुक्ता या प्राध्यापकांच्या संघटनेने केली आहे.
अनेक महाविद्यालये प्राध्यापकांना वेळेत वेतन देत नाहीत. त्यामुळे, महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला प्राध्यापकांना वेतन दिले गेले की नाही, किती दिले आदींची माहिती घेऊन तंत्रशिक्षण संचालनालयाने महाविद्यालयांना चाप लावावा, अशी मुक्ताची मागणी आहे.
या प्रश्नावरून मुक्ताने आझाद मैदानात नुकतेच आंदोलनही केले होते. त्यावर संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे आश्वासन तंत्रशिक्षण संचालकांनी दिले होते. मात्र, त्यावर आजतागायत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे, मुक्ताने संचालकांना पत्र लिहून पुन्हा एकदा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.
खासगी महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया संचालनालयातर्फे राबविली जाते. त्यामुळे, जी महाविद्यालये शिक्षकांचे पगार वेळेत करत नाही त्यांना वेसण घालण्याचे काम संचालनालय सहज करू शकते. मात्र, संचालनालयाचे अधिकारी याकडे कानाडोळा करतात. परिणामी महाविद्यालयांचे फावले आहे. त्यामुळे, प्राध्यापकांच्या वेतन अदा करण्याच्या पध्दतीमध्ये नियमितता यावी यासाठी संचालनालयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी मुक्ताने केली आहे.

Story img Loader