मानवाधिकार, बालहक्क, इतिहासातील शौर्यकथा आदींचा ज्ञानरूपी खजिना ‘सायरस सिलिंडर’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये खुला होणार आहे. विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून ज्ञानाचा भांडार असलेल्या या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील ४०० हून अधिक शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या कार्यशाळांचा फायदा घेता येईल, असा वस्तुसंग्रहालयाचा मानस आहे. जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये या विविधांगी कार्यशाळा, परिसंवाद, मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहेत. कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना अॅनिमेशनद्वारे त्यांच्या हक्कांची माहिती करून देण्यात येईल. केवळ खेळ, ज्ञानापुरतेच या कार्यशाळांचे स्वरूप मर्यादित न ठेवता पाठय़पुस्तक अभ्यासक्रमांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. इतिहास या विषयाबाबत विद्यार्थी नेहमीच उदासीन दिसतात. त्यामुळे बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम, अॅनिमेशन, उठाव शिल्पकला, शिलालेख वा कोरीव कलांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना इतिहासातील शौर्यगाथा सांगण्यात येतील.
याशिवाय आंतरशालेय निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात येणार आहे. या वेळी शिक्षकांसाठीही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून त्यात त्यांना शिकविण्याच्या विविध प्रकारच्या शैलींविषयी माहिती दिली जाईल. प्रदर्शनाविषयी आणि प्राचीन पर्शियन नागरीकरणाविषयीची माहिती देणारा एक विशेष काऊंटर प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. अंध आणि विशेष मुलांनाही या प्रदर्शनाचा अनुभव घेता येईल, याची विशेष सोय करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा