अन्न, वस्त्र व निवारा याबरोबरच ६ ते १४ वयोगटातील मुलांची शिक्षण ही मूलभूत गरज आहे, त्यावर २००९ च्या बालहक्क शिक्षण कायद्यात शिक्कामोर्तब झाले. या कायद्यातील कलमांमुळे अनेक वेळा विविधांगी चर्चा घडवून आणल्या गेल्या. चर्चाचा सूर हा अधिक नकारात्मक व काहीसाच सकारात्मक होता. या कायद्याच्या अंमलबजावणीस या शैक्षणिक वर्षांच्या अखेरीस दोन वर्षे पूर्ण होतील. या कायद्याचे फलित काय, याविषयी ऊहापोह करण्यासाठी पुण्यात मध्यंतरी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात शैक्षणिक गुणवत्ता, सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन, परीक्षा, रचनावाद अशा काही विषयांवर प्रातिनिधिक चर्चा झाली. या सर्व विषयांच्या चच्रेमागे शिक्षणाविषयी नाराजीचाच सूर आळवला गेला. शिक्षकांमधील ‘शिक्षकत्व’ हरवत चालल्याची खंत व्यक्त केली गेली. अर्थात, आज समाजात हा नाराजीचा सूर सार्वत्रिकपणे कमी-अधिक प्रमाणात आळवला जात आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार
नाही.
आजच्या शालेय शिक्षणाची स्थिती खरेच गंभीर आहे. रोज नवीन येणाऱ्या कायद्यातील कलमांची अंमलबजावणी करण्यात शालेय व्यवस्थापन, मुख्याध्यापक व शिक्षक या मनुष्यबळाचा वेळ खर्ची होत आहे. या सर्व कलमांचा अर्थ समजून घेऊन त्यातील गíभतार्थ शोधेपर्यंत नवीन कलमांची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक शाळेत येऊन धडकत आहे.
याबरोबरीनेच रोज नव्या संकल्पना शिक्षण क्षेत्रात रुजवण्याचा अट्टहास कायम चालू आहे. १९८६ च्या राष्ट्रीय अभ्यासक्रमात क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले गेले. २००० व २००५ मधील राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात २१ व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्याचे उद्दिष्ट समोर होते. आता २०१२ मध्ये ज्ञानसंरचनावादाची कास धरण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रशिक्षणांची मालिका रचली गेली. या प्रत्येक कृतीमागे तज्ज्ञांची भूमिका स्पष्ट, उपयुक्त व पारदर्शक होती यात शंका नाही, पण या बदलांची गती पकडण्याचा वेळ शिक्षकांना मिळाला का? याविषयी मात्र कधीही चिंतन झाले नाही.
एखादी नवीन गोष्ट रुजण्यास काही वेळ जावा लागतो. रुजून बहरायला व वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी संयमाची गरज असते. एखाद्या गोष्टीचे आकलन होऊन त्याचे उपयोजन करण्यासाठी मध्ये एका प्रायोगिक पातळीची गरज असते. या प्रायोगिक पातळीवर देवाणघेवाण होणे गरजेचे असते. अनुभवांचे आदानप्रदान व्हावे लागते.
भरपूर प्रयोग करण्याची मोकळीक व मुभा लागते. प्रयोगांसाठी साधनसामग्रीपेक्षा भरपूर प्रोत्साहन व पािठब्याची गरज असते. प्रयोगाची यशस्विता तपासण्यासाठी ‘डोळस’ निरीक्षक जवळपास असावा लागतो. या सगळ्यांबरोबरच एक कौतुकाची जबरदस्त थाप लागते आणि त्यासाठी पुरेसा ‘वेळ’ आवश्यक असतो.
या प्रक्रियेचा विचार शिक्षण क्षेत्रात एखादी नवीन गोष्ट रुजवताना किती वेळा झाला? वरच्या पातळीवर विचारमंथन झाले असेल तर शिक्षकांना ‘गृहीत’ धरले गेले व त्यांना फक्त प्रशिक्षणाच्या चौकटीत सामावून घेण्यात आले. प्रशिक्षणात तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले, पण आता या सर्व प्रकारांत आलेला ‘तोचतोच’पणा शिक्षकांना त्रासदायक ठरत आहे. एकीकडे शिक्षण हे प्रकल्पाधारित असावे, कृतिशील असावे असा आग्रह होत आहे, पण त्याच वेळेस शिक्षकांचे प्रशिक्षण मात्र पारंपरिक पद्धतीने होत आहे. प्रशिक्षणासाठी शिक्षकाला शाळेबाहेर राहावे लागत आहे.
दैनंदिन शिक्षणाचे समायोजन करतानाच एन.टी.एस (NTS) एन.एम.एम.एस. (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षा, होमी भाभा, मराठी निम्नस्तर, दहावी-बारावी मंडळाच्या परीक्षा, गणित अध्यापक परीक्षा अशी विविध परीक्षांची जबाबदारी शाळांना उचलावी लागत आहे.
अर्थात काय होत आहे ही वस्तुस्थिती आपणा सर्वाना माहीत आहे, पण काय व्हायला पाहिजे, शिक्षकांना काय हवे आहे तेही समजून घेतले पाहिजे. शिक्षकांना खरे तर आता थोडा वेळ हवा आहे. नवीन अभ्यासक्रमाशी जुळवून घेताना स्वत:हून काही प्रयोग करून, त्या प्रयोगांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ हवे आहे. या व्यासपीठावर येऊन आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य हवे आहे.
एकाच ठिकाणी ३००-४०० शिक्षकांचे प्रशिक्षण होते. व्यवस्थापनशास्त्रानुसार प्रशिक्षणाची संख्या ४० पेक्षा जास्त असू नये. संख्या मर्यादित असेल तर प्रतिनिधींचा सहभागही वाढतो असा अनुभव आहे. शिक्षक बाकावर व तज्ज्ञ शिक्षक समोर अधिव्याख्याता म्हणून उभा असतो. व्याख्यान स्वरूपात अथवा पीपीटी (Power Point Presentation) च्या मदतीने शिकवले जाते.
या पारंपरिक पद्धतीला छेद देण्याची आवश्यकता आहे. त्याऐवजी कृतियुक्त प्रशिक्षण शिक्षकांना मिळाले, तर अधिक लाभदायी ठरेल. जवळच्या शाळांतील शिक्षकांनी एकत्र यावे. विषयांनुसार एकत्र बसून चर्चा करावी. माहितीच्या स्रोतांची चर्चा करावी व त्यातून एक अध्यापकाचे नवे शास्त्र विकसित करावे; अशा स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षकांना दिल्यास यांत नावीन्यपूर्णता येईल. तसेच शिक्षकांना सहभागी करून घेतल्यामुळे प्रशिक्षणात त्यांना त्याबद्दल रुचीही निर्माण
होईल.
याबरोबरीनेच शिक्षकांना समाजाचीही साथ मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या भावभावनांचा, त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करतानाच शिक्षकांच्या मानसिक आरोग्याचा विचार केला गेला पाहिजे. आज रोज नव्याने येणाऱ्या नियमांच्या चौकटीत स्वत:ला सामावून घेताना शिक्षकांवर ताण येत आहे. त्याचाही विचार झाला पाहिजे. त्यातच या ढासळत्या शिक्षणव्यवस्थेला फक्त शिक्षकच जबाबदार आहे, हा गरसमज दूर करण्याची गरज आहे.
क्लास संस्कृती, बेसुमार विद्यार्थिसंख्या, शिक्षण क्षेत्रातील दलाल, शिक्षण संकल्पनेचे बदलते वास्तव, वाढत चाललेले अर्थकारण या सर्वातून शिक्षकांना शाळेतच राहून जास्तीत जास्त शिकविण्यासाठी निवांत वेळ हवा आहे. शिक्षकत्व हे वर्गात बहरते. या वर्गात शिक्षक जास्तीत जास्त वेळ कसे राहतील याचे नियोजन हवे आहे.
सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हापासून प्रशिक्षणांचा महापूर आला, पण आता प्रशिक्षणांऐवजी छोटय़ा छोटय़ा गटसमूहांच्या कार्यशाळांची गरज आहे. अशा कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांच्या कृतिशील कार्यक्रमांच्या नियोजनास प्राधान्य दिले जावे.
‘शिक्षक’ हे एक सृजनशील व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येक शिक्षक हा कोणत्याही वयापर्यंत शिकून घेण्यास तत्पर असतो, पण शिक्षकांना शिकण्यासाठीसुद्धा उत्तम शैक्षणिक पर्यावरणाची गरज आहे, जेथे त्यांची कल्पनाशक्ती बहरेल, शोधक वृत्तीला खतपाणी मिळेल.
शेवटी योग्य व्यासपीठ, प्रायोगिक संधी, कृती कार्यशाळा, शैक्षणिक पर्यावरण व शिक्षकांविषयी दृढ सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच शिक्षकांमधून हरवत चाललेले शिक्षकत्व गवसणार आहे. ते गवसण्यासाठी सर्व शिक्षण क्षेत्रातील समाजधुरिणांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
हरवलेले शिक्षकत्व गवसण्यासाठी..
अन्न, वस्त्र व निवारा याबरोबरच ६ ते १४ वयोगटातील मुलांची शिक्षण ही मूलभूत गरज आहे, त्यावर २००९ च्या बालहक्क शिक्षण कायद्यात शिक्कामोर्तब झाले. या कायद्यातील कलमांमुळे अनेक वेळा विविधांगी चर्चा घडवून आणल्या गेल्या.
First published on: 28-01-2013 at 12:05 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To find lost of teacher principle