कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा’च्या सर्व अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र लेखी परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा आता १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.
विद्यापीठाच्या पूर्वनियोजित सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा विविध संघटनांद्वारे पुकारण्यात आलेल्या कामबंद आंदोलनामुळे अडचणीत सापडल्या होत्या. या परीक्षांचे नियोजन करणे अवघड झाल्यामुळे विद्यापीठास परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेणे भाग पडले होते. कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आता विद्यापीठाने लेखी परीक्षांचे फेरनियोजन केले आहे. त्यानुसार हिवाळी सत्र २०१३ सर्व लेखी परीक्षा १७ डिसेंबर २०१३ पासून सुधारित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. या परीक्षेस पात्र ठरणाऱ्या परिक्षार्थीचे परीक्षा पत्र १२ डिसेंबरपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या http://www.muhs.ac.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे

Story img Loader