विद्यार्थी मित्रांनो, ‘मी आयएएस/ आयपीएस/ आयएफएस होणारच’ हे ध्येयवाक्य तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवर ठळक अक्षरात लिहून ठेवा. रात्रीच्या गाढ झोपेनंतर सकाळी उठल्याबरोबर ही अक्षरे तुमच्या दृष्टिपटलावर पडली पाहिजेत. संघराज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन, प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न तुमच्या डोळ्यांनी रोज जागेपणी पाहिलेच पाहिजे. हे स्वप्नच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत न्यायला प्रवृत्त करेल. मात्र केवळ तुम्ही स्वप्न पाहिले आणि त्यासाठी निश्चयाने आणि निष्ठेने प्रयत्न केले नाहीत, तर तुमचे ते स्वप्न एक दिवास्वप्नच ठरेल. म्हणूनच तुमच्या ध्येयाला निश्चित दिशा देण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज लागेल आणि हेच मार्गदर्शन या लेखमालिकेतून आम्ही दररोज करत राहू. खरतर यूपीएससी परीक्षेचा हा प्रवास साधा, सरळ, सोपा नाही. काटय़ाकुटय़ांनी भरलेल्या या वाटेवरून चालताना यशाचा कोणताच शॉर्टकट तुम्हाला सापडणार नाही. मात्र अवघड प्रवासातील तुमचे वाटाडे होण्याचे काम आम्ही करू शकतो, यशस्वी विद्यार्थ्यांनी ओलांडलेली पायवाट तुम्हाला दाखवू शकतो. पण लक्षात ठेवा खरा रस्ता तुम्हाला एकटय़ालाच शोधायचा आहे.
‘यशाचे वाटेकरी अनेक असतात, पण अपयश पोरके असते’ आणि त्यामुळेच खात्रीने यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्वत:ला तपासावे लागेल. तुम्हाला स्वत:लाच प्रश्न विचारावा लागेल- ‘खरंच ही परीक्षा मला पास व्हायची आहे का? प्रशासनात जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करायची आहे का?’ आणि मित्रांनो तुमच्या अंतर्मनाने होकाराचा कौल दिल्यावरच तुम्ही या परीक्षेच्या तयारीला लागा.
पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांमधून पार पडणारी ‘यूपीएससी’ची परीक्षा तुमच्या व्यक्तिमत्त्वाची कसोटी घेणारी असते. ही कसोटी केवळ तुमच्या एकटय़ाचीच नसते, तर तुमचे कुटुंबही या प्रक्रियेत समाविष्ट असतात. स्पर्धा परीक्षेसाठी तुमच्या मनाची तयारी झाल्यानंतर तुमच्या घरातील सदस्यांना तुम्ही विश्वासात घ्या. त्यांनी तुम्हाला दिलेले भावनिक पाठबळ फार महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या, मी आर्थिक पाठबळाविषयी बोलत नाही.
कारण या अभ्यासासाठी खूप पैशांची गरज नसते. पण तुम्हाला धीर देणाऱ्या, तुमच्यावर विश्वास टाकणाऱ्या माणसांची मात्र गरज असते. ही माणसे केवळ तुमच्या कुटुंबातीलच नाही तर आजूबाजूच्या सोशल सर्कलमधीलदेखील असू शकतात.
तुम्हाला कधीकधी असे दिसून येईल की तुमचे नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये काही व्यक्ती ‘यूपीएससी’बद्दल नकारात्मक विचारांच्या आहेत. ‘ही परीक्षा कुणी पास होत नाही, यासाठी खूप पैसा लागतो, वशिला लागतो’ अशा प्रकारची विधाने करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. संघराज्य लोकसेवा आयोगाची निवडप्रक्रिया अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक आहे. आयोगाने परीक्षार्थीचे जाणूनबुजून नुकसान कधीच केलेले नाही आणि त्यामुळेच तुम्ही आयोगाच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या स्पर्धा परीक्षेला सामोरे जा. तुमचा स्वसामर्थ्यांवरील विश्वास, तुमचा संघराज्य लोकसेवा आयोगाच्या निवडप्रक्रियेवरील विश्वास या महत्त्वाच्या शिदोरीवर तुम्ही परीक्षेचा पुढचा प्रवास पार पाडू शकता. त्यासाठी तुम्हाला काही आवश्यक साधने प्राप्त करावी लागतात. ही संसाधने परीक्षांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असणारी आहेत.
‘यूपीएससी’ची परीक्षा अखिल भारतीय पातळीची असल्याने आणि देशातील कानाकोपऱ्यांतून विद्यार्थी तयारी करत असल्याने तुम्हाला काही शैक्षणिक, भाषिक, बौद्धिक कौशल्ये मिळवावी लागतील. आतापर्यंत पदवी परीक्षेचा तुम्ही केलेला अभ्यास आणि या अभ्यासाची पातळी यात महद्अंतर आहे. पदवी परीक्षेचा अभ्यास ठराविक धडय़ांचा, प्रकरणांचा, थोडक्यात म्हणजे आखून दिलेल्या चौकटीचा असतो, तर ‘यूपीएससी’च्या परीक्षांचा अभ्यास याचा अभ्यासक्रम दिला असला तरी केवळ तो अभ्यासक्रमापुरताच असेल असे नाही. चौकटीबाहेरचा अभ्यास समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांची आकलनक्षमता वाढवली पाहिजे.
तुम्ही शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर हुशार विद्यार्थी असाल तर तुमचे काम सोपे होते. पण जरी साधारण असाल तर डगमगून जायचे कारण नाही. तुम्ही प्रयत्नांनी तुमची ज्ञानग्रहणक्षमता विस्तारू शकता. त्यासाठी वाचन, लेखन, चिंतन या सर्वमान्य त्रयींचे योजन विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासात करावे. या त्रयीतील चिंतनाच्या टप्प्याला लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनन्यसाधारण महत्त्व आहे.
चिंतनप्रक्रियेमध्ये तुम्ही जे वाचता त्याचे Interpretation (अवलोकन) तुम्हाला करता आले पाहिजे. भवतालच्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक पर्यावरणाशी तुम्हाला Relate होता आले पाहिजे. (क्रमश:)

Story img Loader