विद्यार्थी मित्रांनो, काल आपण संघलोक सेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीचे विवेचन केले. आजच्या लेखांकामध्ये आपण पूर्वपरीक्षेची सविस्तर चर्चा करणार आहोत. ‘यूपीएससी’च्या वेबसाइटवर या चाळणी परीक्षेची नियोजित तारीख २६ मे २०१३ अशी दिलेली आहे. मात्र हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत तरी आयोगाने परीक्षेची जाहिरात दिलेली नाही. हा विलंब होण्याचे कारण असे आहे की यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपात काही मूलभूत बदल करण्याचे ठरवत आहे.  अलघ कमिशन, ए.आर.सी. (ARC) रिपोर्ट २, यातून अशा बदलांचे सूतोवाच सरकारने केलेले आहे. २०१२ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने आणखी एक समिती नेमली होती आणि त्या समितीच्या दिशादिग्दर्शनातून मुख्य परीक्षेमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत.
आता विद्यार्थी पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम अभ्यासत आहेत, तो अभ्यासक्रम २०११ पासून लागू झालेला आहे. सामान्य अध्ययन (प्रश्न १०० मार्क २००) तर सामान्य अध्ययन २ (प्रश्न ८० मार्क २००) या दोन विषयांमध्ये तुम्ही मिळविलेल्या एकत्रित मार्कावरून तुमचे पूर्वपरीक्षेतील यश निश्चित होते आणि मुख्य परीक्षेची अलिबाबाची गुहा तुमच्यासाठी उघडी होते. याअगोदर G.S. II ऐवजी प्रश्नपत्रिकेत एक वैकल्पिक विषय दिलेला असायचा ज्याची गुणसंख्या ३०० असायची आणि प्रश्न १००/१२० असायचे. त्यावेळी देखील सामान्य अध्ययन क हा पेपर अभ्यासक्रमात असायचा आणि त्यामध्ये १५० गुणसंख्येचे १५० प्रश्न असायचे. आता मात्र वैकल्पिक विषय पूर्वपरीक्षेतून काढून टाकला आहे आणि संपूर्णत: नवीन पॅटर्नचा सामान्य अध्ययन-२ (सी-सॅट) हा पेपर परीक्षेमध्ये अंतर्भूत केला आहे.
‘यूपीएससी’ने सिव्हिल सव्‍‌र्हिस अ‍ॅप्टिय़ुड टेस्ट (सी-सॅट) ही प्रश्नपत्रिका बदलत्या काळाची आव्हाने लक्षात ठेवून अभ्यासक्रमात अंतर्भूत केलेली आहेत. यामध्ये सुमारे निम्मे प्रश्न बुद्धिमत्ता, अंकगणित यावर आधारलेले असतात. तर बाकीचे प्रश्न इंग्रजी भाषेची आकलन क्षमता तपासणारे असतात. इंग्रजी भाषेतील परिच्छेद हिंदीमध्ये भाषांतरित करून, प्रश्नपत्रिकेत दिलेले असतात त्यामुळे हिंदी भाषेवर पकड असणाऱ्या परीक्षार्थीची सोय होऊ शकते. मात्र आयोग दोन- तीन परिच्छेद केवळ इंग्रजी भाषेत देऊन त्याला हिंदीचा पर्याय ठेवत नाही आणि त्यातून विद्यार्थ्यांचे आंग्लभाषेचे ज्ञान तपासते. २०११ च्या सी-सॅट पेपरमध्ये व प्रश्न आणि २०१२ च्या पेपरमध्ये आठ प्रश्न या प्रकारचे होते.
पूर्वपरीक्षेच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांमध्ये निगेटिव्ह मार्काचा अवलंब केला जातो. एका प्रश्नाचे उत्तर चुकले की १/३ मार्क एकूण गुणांमधून वजा केले जातात. यामुळे उत्तर माहीत नसेल तरी अंदाजाने उत्तर शोधण्याच्या उमेदवाराच्या प्रवृत्तीला लगाम बसू शकतो. थोडक्यात अचूकता आणि नेमकेपणा असलेल्या उमेदवारांचा शोध घेण्याचे आयोगाचे कार्य सुलभ होते. मात्र ‘सी-सॅट’च्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्क्‍सबाबत काही प्रश्नांमध्ये अपवाद केलेला आहे. २०११ साली आठ आणि २०१२ साली सात प्रश्न पेनल्टी नसलेले होते. म्हणजेच या प्रश्नांची उत्तरे चुकली तरी एकूण गुणांमधून त्याची वजावट होणार नसते.
महत्त्वाचे असणारे हे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रशासक म्हणून छबी बघणारे असते. उदा. तुम्ही कलेक्टर आहात आणि एखादा प्रसंग घडला तर तुम्ही काय निर्णय घ्याल, असा प्रश्न विचारला जातो आणि चार जवळजवळ बरोबर वाटणारे पर्याय उत्तरासाठी दिले जातात. खरे तर असे प्रसंगानिष्ठ प्रश्न आयोगाचे सदस्य उमेदवारांना मुलाखतीदरम्यान विचारत असतात. परंतु सध्या असे प्रश्न पूर्वपरीक्षेतच विचारले जातात आणि उमेदवारांमध्ये अधिकारी होण्याची क्षमता आहे का, याची चाचपणी केली जाते.
सी-सॅटमधील बौद्धिक क्षमता, गणित यांचे ज्ञान तपासणारे प्रश्न स्कॉलरशिपच्या परीक्षेसारखे असतात. परंतु त्यांची काठीण्य पातळी उच्च दर्जाची असते. मोजक्या वेळामध्ये असे प्रश्न सोडविण्यासाठी नियमित सरावाची आत्यंतिक गरज आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिवसातील काही तास या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी नित्यनियमाने बाजूला काढावेत. अशा प्रकारे सामान्य अध्ययन-२ या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांची भाषिक आणि गणिती अशी दोन्ही कौशल्ये बारकाईने तपासली जातात. या विषयाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना खालील पुस्तकांतून योग्य दिशा सापडू शकते-

’    CSAT CONCEPTUAL APPROACH- Paper II (पिअर्सन पब्लिकेशन)
’    General Studies- Paper II
    (टाटा मॅकग्रॉ हिल वुई सीरिज)

सामान्य अध्ययन कक (सी-सॅट) या पेपरची चर्चा केल्यानंतर आपण सामान्य अध्ययन-क या पेपरकडे वळू या.
या प्रश्नपत्रिकेमध्ये चालू घडामोडी, इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, भारतीय राज्यव्यवस्था, भारताचा व जगाचा भूगोल, आर्थिक व सामाजिक विकास, पर्यावरणशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि सामान्य विज्ञान या घटकांचा समावेश असतो. वरील विषयांचा आवाका पाहिल्यास लक्षात येईल की, आयोगाला चौफेर वाचन करणारे विद्यार्थी प्रशासक म्हणून हवे आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतल्यास तुमच्या लक्षात येईल की, प्रश्नांचे स्वरूप प्रत्येक वर्षांगणिक अधिकाधिक चिकित्सक आणि सूक्ष्म होऊ लागले आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी वरील घटक अभ्यासताना त्यातील माहिती विश्लेषणातून समजून घेतली पाहिजे.
(क्रमश:)

Story img Loader