सतत शंभर टक्के निकाल, विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींना वाव देणारे अनेक उपक्रम आणि आजच्या जगात लागणाऱ्या खणखणीत गुणवत्तेची हमी हे सारेच परभणीतल्या विश्वशांती ज्ञानपीठात एकवटले आहे.
परभणीपासून जवळच असलेल्या राहटी या ठिकाणी यज्ञकुमार करेवार यांनी १९९८ साली ‘विश्वशांती ज्ञानपीठ’ या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला मर्यादित विद्यार्थीसंख्येवर सुरू करण्यात आलेले हे निवासी गुरुकुल आज एक हजार विद्यार्थ्यांना घडविणारी प्रयोगशील शाळा म्हणून नावारूपाला आलेली आहे. केवळ आठ वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले विद्यार्थी आज विश्वशांती ज्ञानपीठमध्ये शिक्षण घेताना दिसतात.
आंतरराष्ट्रीय मानांकनाचा दर्जा प्राप्त केलेल्या या संस्थेने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले. सध्या ग्रामीण भागात असलेल्या भारनियमनाच्या समस्येवरही संस्थेने उपाय शोधला. ‘आमची शाळा आमची वीज’ असा नवा मंत्र या शाळेने दिला. परिसरातल्या वाळलेल्या लाकडांपासून या शाळेत वीजनिर्मिती केली जाते. त्यामुळे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या या संस्थेला भारनियमनाची कटकट नाही. या वैशिष्टय़पूर्ण प्रकल्पास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे संस्था व्यक्तिगत लक्ष पुरवते. शाळा कंटाळवाणी वाटू नये असाच कायम प्रयत्न असतो. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे मन या शाळेत रमते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा संस्थेने पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. माध्यमिक स्तरावर प्रत्येक वर्गात केवळ चाळीस विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांना आपल वर्ग म्हणजे कोंडवाडा वाटत नाही. जे विद्यार्थी एखाद्या विषयात कच्चे आहेत त्यांना तयार करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते.
उच्च माध्यमिक स्तरावर कला, विज्ञान, वाणिज्य या तिन्हीही शाखा गुरुकुलात आहेत. अभिजात भाषांबरोबरच संगणकाचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी परिश्रम घेतले जात आहेत. पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्गाचा निकाल या गुरुकुलात सदैव शंभर टक्के असतो आणि नव्वद टक्क्यांहून अधिक विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण होतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला पलू पाडण्याचे काम संस्थेच्या वतीने केले जाते. राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय हरित सेना यांसारखे उपक्रम संस्थेत हिरिरीने राबवले जातात.
विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ असेल तरच ते अभ्यासात प्रगती साधतात. याच उद्देशाने दहा हजार चौरस फुटांचे भव्य असे ज्ञानमंदिर संस्थेने साकारले आहे. दररोज योगासनासह प्रार्थना या ठिकाणी होते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय, मुलांना असलेली शुद्ध व थंड मिनरल पाण्याची व्यवस्था, नियमितपणे भरणारे पालक मेळावे, शैक्षणिक सहली अशा अनेक वैशिष्टय़ांनिशी या शाळेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यज्ञकुमार करेवार यांच्या अथक परिश्रमातून आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. संपूर्ण मराठवाडय़ातच नव्हेतर मराठवाडय़ाच्याही बाहेर आज ‘विश्वशांती ज्ञानपीठ’ची स्वतंत्र ओळख आहे.
आज अतिशय रम्य असा वीस एकरचा परिसर ही या शाळेची जमेची बाजू आहे. विद्यार्थ्यांना घडवण्याबरोबरच ही शाळा सामाजिक उपक्रमांमध्येही अग्रेसर आहे. ज्या माताभगिनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चे कर्तृत्व निर्माण करतात त्यांचा गौरव मातोश्री सरूबाई करेवार यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या ‘आदर्श माता’ पुरस्काराने होतो. सिंधुताई सपकाळ, प्रयाग कराड आदींना या संस्थेने या पुरस्काराने गौरवले आहे. दर महिन्याला होणारी पालक सभा असो अथवा सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसह होणारा स्नेहबंध मेळावा असो, त्यातून संस्था आपली उपक्रमशीलताच अधोरेखित करते. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना दिले जाणारे मार्गदर्शन, समुपदेशन केंद्र, अलीकडेच संस्थेने यशस्वीपणे राबवलेला गुणवत्तासुधार प्रकल्प हे या संस्थेचे लक्षणीय उपक्रम आहेत. मागास भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी झटणाऱ्या या संस्थेचा उत्तरोत्तर उत्कर्ष होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा