वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या वसतिगृहांमध्ये वायफाय सेवा पुरविण्यात येणार आहे. राज्याच्या विविध सरकारी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तब्बल १६०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी इंटरनेटचा वारंवार वापर करावा लागतो. त्यासाठी अनेक विद्यार्थी आपला स्वत:चा लॅपटॉप बाळगतात. आता या विद्यार्थ्यांना वसतिगृहांमध्ये मोफत इंटरनेट वापरता यावे यासाठी वायफाय सेवा उपलब्ध केली जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाचे नवनियुक्त मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विद्यार्थी वसतिगृहांच्या विकासासाठी काय करता येईल, याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. त्याचवेळी वसतिगृहांमध्ये मोफत वायफाय उपलब्ध करून देण्याचा विचार पुढे आला. ही सुविधा सर्व महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी किती खर्च येईल, याची चाचपणी वैद्यकीय शिक्षण संचालकांना करण्यास या बैठकीत सांगण्यात आले. वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनीही या माहितीला दुजोरा दिला. देशाच्या विविध भागात असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये माहिती व ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी, यासाठी केंद्र सरकारही विविध योजनांच्या माध्यमातून ‘व्हच्र्युअल लायब्ररी’सारख्या कल्पना सध्या राबवीत आहे. वैद्यकीय शिक्षणात तर ही कल्पना गेली अनेक वर्षे राबविली जात आहे. उदाहरणार्थ, मुंबईतील सेंट जॉर्जेस या दंत महाविद्यालयाचे ग्रंथालय देशभरातील सुमारे एक हजार संस्थांच्या ग्रंथालयाशी जोडले गेले आहे.
 त्यामुळे या महाविद्यालयाची इतर संस्थांशी शैक्षणिक देवाणघेवाण सोपी झाली आहे. आता वसतिगृहांमध्ये वायफाय आल्यास विद्यार्थ्यांना आपल्या खोलीत बसून त्यांच्या विषयाची संबंधित संदर्भ व माहिती संगणकावर मिळविता येणे शक्य होईल, असे सेंट जॉर्जेसचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार यांनी सांगितले.
गैरवापरही रोखणार
या सुविधेचा काही विद्यार्थ्यांकडून गैरवापरही होऊ शकतो. त्यामुळे यादृष्टीनेही काळजी घ्यायला हवी, असे नमूद करत एका प्राध्यापकांनी या सेवेच्या दुरुपयोगाकडे लक्ष वेधले.