उत्तम खाणं पिणं यासोबत काय जमतं? संगत, स्नेही, मित्रमत्रिणी, कुटुंब, थोडक्यात माणसं. अशी कंपनी असली की रोजचं साधं जेवण पण रुचकर लागतं. जेवणच जरा हटके असेल तर मग सगळा माहोल मस्त रंगतदार होऊन जातो. तब्येतीत मस्त बसून काही चटकदार खाताना चकाटय़ा पिटणं किंवा गप्पा मारणं हे हल्ली घाई-गर्दीच्या जीवनात तसं दुर्मीळ होत चाललेलं आहे. तरीदेखील कधी तरी दैनंदिन जीवनातून विरंगुळा म्हणून असं काही तरी आयोजित केलं जातं. शक्यतो घरापासून दूर, मोकळ्या वातावरणात हल्ली मफली रंगू लागलेल्या आहेत. सध्या मोसम एकदम गुलजार असल्याने अशा आऊट डोअर पाटर्य़ा लोकप्रिय होत आहेत. महाराष्ट्रात यात तीन प्रकार बिनीचे शिलेदार आहेत – हुरडा पार्टी, भरीत पार्टी आणि पोपटी. अस्सल मराठी देशी मेजवानी!
खरं सांगायचं तर यांना पार्टीचं असं रूप हल्ली हल्ली आलंय. आधी संपूर्णपणे कौटुंबिक असलेले हे प्रकार प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत. एवढे की त्याला उद्योग किंवा जोडधंद्याचं स्वरूप आलं. हुरडा पार्टी पुणे आणि आसपासचा भाग पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथे होतात. भरीत पाटर्य़ा खानदेश, जळगाव, धुळे येथे प्रचंड प्रसिद्ध आहेत आणि पोपटीकरता अलिबाग, उरण, थोडक्यात रायगड भाग आणि काही ठिकाणी भिवंडी, वाडा.
साधारणपणे जानेवारीपासून या पाटर्य़ाचा हंगाम सुरू होतो. पुण्याच्या आसपासच्या भागात खूप मोठय़ा प्रमाणात हुरडा पार्टी होतात. म्हणजे थोडक्यात रस्टिक लाइफ! एका दिवसात एन्जॉय करणाऱ्यांना हा उत्कृष्ट पर्याय आहे. खरं तर याला हुरडापार्टी नाव हे संपूर्णपणे मार्केटिंग तंत्र आहे. शेतात राखणीला राहताना म्हणा किंवा गप्पांचे फड जमवताना तोंडाला चाळा म्हणून तिथल्याच उपलब्ध साधनसाम्रगीत काही तरी झटपट करायचे. यातूनच ताज्या रसाने भरलेला दुधाळ कोवळा हुरडा भाजून खाल्ला जायचा. बापे आणि हुच्ची पोरं यांची गम्मत आता शहरी लोकांना भुरळ घालू लागली आहेत. पुणे येथे शनिवारी-रविवारी साधारण ३०० ते ४०० जण, अनेक जण कुटुंबासह हुरडा पार्टीसाठी येतात, असे ‘कल्पतरू बाग’च्या प्रतीक कंद यांनी सांगितले. अस्स्ल हुरडा पार्टीत फक्त आणि फक्त हुरडा असतो. चवीला लसूण/ शेंगदाणे / तीळ / चटणी, दही. पण शहरी पर्यटकांच्या लाडावलेल्या जिभेकरता येथे अनेकदा भजी, शेव, पिठलं, भाकरी, उसाचा रस, रेवडी, चिक्की दिली जाते. साधारणपणे दुपारी-रात्री साधारण बारा-साडेबाराच्या सुमारास सुरू होणारी ही हुरडा पार्टी पार पाचेक वाजेपर्यंत चालते. गोवऱ्यांच्या आगीवर हुरडा मस्त भाजला जातो. तो ताटलीत देतात, जोडीला झणझणीत चटणी आणि घट्ट दही. महाराष्ट्राचा रांगडा सणसणीत खुराक. या हुरडय़ात जी ज्वारी वापरली जाते ती आपल्या नेहमीच्या भाकरीकरता वापरली जाणारी ज्वारी नसून सुरती जातीची ज्वारी असते.
दाणे किंवा हुरडा भाजणे हे तसे कौशल्याचं काम असतं. ते व्यवस्थित शेकले गेले पाहिजेत पण कोरडे होऊ नयेत. हातावर चोळून तोंडात टाकल्यावर मस्त रसाने तोंड भरलं की मग गप्पांना जबरदस्त सूर लागतो. पुन्हा तोंडी लावायला चटणी आणि घसा ओला करायला ताक किंवा उसाचा रस.
सोलापूरच्या ‘अभिषेक मळा’चे राजू भंडार कवठेकर हुरडय़ाविषयी भरभरून बोलत होते. गेले पंधरा वर्ष ते या व्यवसायात आहेत. साधारणपणे डिसेंबरपासून यांच्या पाटर्य़ा जोरात सुरू होतात. इकडे हुरडय़ासाठी जी ज्वारी वापरली जाते त्याला मऊचा हुरडा म्हणतात. आणि तो फक्त गोवऱ्यांवरच भाजला जातो. सोबत चटण्या, भुईमूग शेंगा, ताक असतेच. पण त्याच जाळात कोवळी वांगी, कांदे खरपूस भाजून पाहुण्यांना देतात. सोबत जेवणात पेंडपाला, गरगट्टा, ज्वारीच्या कडक भाकऱ्या, वांगी मसाला असतो. एकदम अस्सल गावरान थाटात होते ही हुरडा पार्टी! बोरकर मळा, पुणे येथे होणारी अक्षय बोरकर यांची हुरडा पार्टी तर पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात लोकप्रिय आहे. सुरती हुरडाच नव्हे तर लाकडी चरख्यावरचा उसाचा रस, बलगाडीतून फेरफटका, मचाण असे अनेक प्रकार येथे आहेत.
हे झाले व्यावसायिक पातळीवरील हुरडा पार्टीचे. पण घरगुती स्तरावर तर अनेक ठिकाणी अशा पाटर्य़ा आयोजित केल्या जातात. याच धर्तीवर खानदेश, जळगाव, धुळे या भागांत ‘भरीत पार्टी’ होते. या भागामधील लेवा पाटीदार समाज अशा पाटर्य़ाकरता प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्य़ातील साळवे येथील उषा वाणी वांगी ठेचता ठेचता सांगत होत्या, ‘अस्सल खानदेशी भरीत कापसाच्या काटक्यावर/ काडय़ांवर भाजून ते बडजी (लाकडी खलबत्ता)मध्ये चेचले जाते. या चेचलेल्या वांग्यात मग जहाल तिखट अशा हिरव्या मिरच्यांच्या ठेच्याची फोडणी दिली जाऊन त्यात कांदापात, ओला लसूण, शेंगदाणे, मीठ घालून भरीत तयार होते. वांगी भाजल्यावर जे तेल सुटते ते चेचताना भरतात पूर्ण मुरवणे आवश्यक असते.’ उषाताईंच्या मते अशा भरताला फक्त या भागातली वांगी उत्तम! खासकरून बामणोद, रावेर येथील वांगी फक्त भरतासाठीच प्रसिद्ध आहेत.
भरीत पार्टी ही अजूनही निव्वळ कौटुंबिक स्तरावर केली जाते. मोहिनी पाटील अशा भरताकरता स्नेह्य़ामध्ये लोकप्रिय आहे. या भरतासोबत कळणाची भाकरी, कांद्याची कोशिंबीर, बाजरी पुरी, तळलेली मिरची हे असायलाच हवे, असे मोहिनीने सांगितले. ती या हंगामात गावावरून वांगी भाजून आणते किंवा घरी भाजून चक्क फ्रिजमध्ये ठेवते. आयत्या वेळेला कधीही भरीत तयार. या भरतामध्ये मुख्य असते ते वांगे भाजणे. करपू न देता ते चारही बाजूने व्यवस्थित भाजून लाकडाच्या बडगीतच चेचायचे वा ठेचायचे असते. मोहिनीच्या मते काही ठिकाणी सुकं खोबरं, तीळ घातले जातात तर काही ठिकाणी फक्त पातीचा कांदा, लसूण, शेंगदाणे. प्रत्येक घराची पद्धत वेगवेगळी असते. गंमत म्हणजे या भरतामध्ये टोमॅटो घातला जात नाही आणि हळदही नाही, पण सोबत कळणाची (ज्वारी उडीद) भाकरी हवीच हवी. भरीत पार्टी साधारण सकाळी ११ वाजता सुरू होते आणि तब्येतीत दुपापर्यंत चालते. वांगी भाजणे, ती व्यवस्थित चेचून घेणे हे काम बरेचदा पुरुषवर्गच करतो. बायकांकडे मिरच्यांचा ठेचा, कांदा कापणे, भाकऱ्या करणे ही कामे असतात. या पाटर्य़ाचा हंगाम या भागामध्ये जोरात आहे.
याच धर्तीवर उरण, चिरनेर, अलिबाग थोडक्यात रायगड जिल्ह्य़ात ‘पोपटी पार्टी’ होते. साधारणपणे जानेवारीच्या अखेरीस याचा हंगाम असतो. शेतात लावलेले वाल तयार झाले की पोपटी लागते. ही पोपटी खरं तर शेतात राखणीला थांबणाऱ्या राखण्यांनी सुरू केली असावी, असे सुनील डोळस म्हणाले. तिथल्याच शेतात उगवणारे वाल /घेवडी शेंगा, कोवळे नवलकोल, छोटी वांगी, शेवग्याच्या शेंगा, बटाटे, कांदे हे सगळे वापरले जाते. या भाज्यांना बारीक कापायचे किंवा सोलायचेही नसते. फक्त चिरा देऊन त्यात हिरवा मसाला, खोबरे, आले लसूण, कोथिंबीर, मिरची व्यवस्थित चोळून मीठ लावले जाते आणि हा मसालासुद्धा गुळगुळीत न वाटता कुटून घालायचा असतो. शेतात पुरुषांकडून केला जाणारा प्रकार असल्यामुळे फार वाटणं, घाटणं, बारीक कापणं या गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही. याच भागात भांबुरडय़ाचा पाला मिळतो. भरिताची वांगी जशी कापसाच्या कांडय़ांवर भाजतात तसेच पोपटीत भांबुरडा हवाच. मडक्यात तळाला हा पाला घालून त्यात भाज्या घातल्या जातात आणि वर हाच पाला दाबून भरून मडके बंद करतात. एका खड्डय़ात गवतावर मडके उलटे ठेवून भोवती आग करून साधारण तासभर रटरटू देतात.
काही ठिकाणी हा सर्व माल-मसाला केळीच्या पानांमध्ये गुंडाळून नंतर मडक्यात रचतात. ‘त्रिगुण रिसोर्ट’ अलिबागच्या प्रवीण दाखवे यांच्या पोपटी पार्टीला अनेक ‘सेलेब्रिटी’ उपस्थिती लावून गेले आहेत.. पूर्ण कौटुंबिक पद्धतीची शाकाहारी, मांसाहारी पोपटी येथे होते. पोपटीला अत्यंत बेसिक मसाला लागतो. खरी पोपटी ही पूर्णत: शाकाहारी असते. पण शौकिन लोक चिकन, अंडी याची ही पोपटी करतात. खरी पोपटी रात्रीच केली जाते, पण सध्या याला उद्योगाचे रूप आल्यामुळे अनेक ठिकाणी पोपटी सकाळी सुरू होऊन पार संध्याकाळपर्यंत चालतात.
वृंदावन कृषी पर्यटन, वरई नेरळची केतकी म्हसकर पोपटीतज्ज्ञ झालीय असं म्हणायला हरकत नाही. तिच्या मते पोपटी ही खरं तर पूर्ण शाकाहारी. शेतातल्या उपलब्ध फळभाज्या, भाज्या घेऊन मोजक्या साधनसाम्रगीतून काही तरी चमचमीत करायचे यातून पोपटी उदयाला आली. म्हणून पोपटीत खूप फाफटपसारा आढळणार नाही. लसूण, आले, कोथिंबीर, मिरच्या, ओवा, जिरे यांचे जाडसर वाटण करून या मसाल्यात कांदे, बटाटे, पावटय़ाच्या कोवळ्या शेंगा, छोटी वांगी, शेवगा शेंग, तूर, कोनफळ, कणगी, नवलकोल, भुईमूग असा सगळा देशी वाण घालून केतकी पोपटी करते. आणि हो त्यात भांबुरडीचा पाला हवाच, त्याला या पट्टय़ात खारबट्टी पाला म्हणतात. त्याचे अन्य औषधी उपयोग आहेत. मडक्यात भाज्या रचून त्या बाहेर न सांडू देता भरणे हे कौशल्याचे असते आणि पोपटी अधिक तापली तर करपते. सुनील डोळस आणि कुटुंबीय हंगामात अनेकदा पोपटी आयोजित करतात. अर्थात इथे चिकन आणि अंडी अधिक. पोपटीला अनेक जण उंधियो समजतात पण दोघांचीही करण्याची पद्धत आणि सामग्री वेगळी आहे. पोपटीसोबत बाकी काही दिले जात नाही. अगदीच हवी असल्यास या भागामधली प्रसिद्ध तांदूळ भाकरी मिळते. सुरुवातीला हा प्रकार बहुतांशी पुरुषांचाच असायचा. पण सध्या मात्र कौटुंबिक पोपटी पाटर्य़ा भरपूर होताना आढळतात. या भागातील शेतकऱ्यांना उत्तम जोडधंदा मिळाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. या तीनही प्रकारांचे मुख्य वैशिष्टय़ काय तर विनाकारण फाफटपसारा नाही. आपले मेजवानीचे ताट म्हटले की सतरा भाज्या आणि वीस आमटय़ा असा प्रकार आढळतो, त्यामुळे धड कोणत्याच पदार्थाला व्यवस्थित न्याय देता येत नाही. हुरडा, भरीत आणि पोपटी या तीनही प्रकारांत मुख्य पदार्थ एकच असल्याने पूर्णपणे आस्वाद घेतला जातो.
सध्या वातावरण छान गार आहे. भाज्यांचा मोसम चांगला आहे. एखादा रविवार पाहून एकदा तरी अशी भरीत, हुरडा पार्टी किंवा पोपटी यांचा अनुभव घेणे ये तो बनता ही है!
शुभा प्रभू साटम
shubhaprabhusatam@gmail.com