आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.
काही पदार्थाच्या नावाचा आणि त्यांच्या स्वभावाचा तसा अर्थाअर्थी फारसा संबंध नसतो. आपण तो कालांतराने जोडतो. आंबवलेल्या पिठाची ती ‘आंबोळी’ हे पटतं, पण ‘उपमा’ हे नाव त्या पदार्थाला का दिलं गेलं असावं ते उमजत नाही. ज्या पदार्थाचं नाव व रंगरूप यांचा परस्परांशी संबंध जुळतो त्या पदार्थापकी एक म्हणजे चिक्की. गुळाचा चिकटपणा हिच्या नावातच ओथंबून भरलेला आहे. पण या चिकटपणाला गोडव्याची देखील साथ आहे. चिक्कीचं मूळ शोधताना लोणावळा चिक्कीकडे आपलं लक्ष जाणं स्वाभाविक आहे. सातारचे कंदी पेढे, कोल्हापुरी तांबडा रस्सा, मालवणी खाजं तसं लोणावळा चिक्कीचं समीकरण पक्कंआहे. चिक्कीचा प्रसार लोणावळ्यातून झाला, मात्र तिचं मूळ वेगळ्या स्वरूपात पूर्वीपासून अस्तित्वात होतंच. घरी आलेल्या पाहुण्याला गूळपाणी द्यायची पद्धत होती. प्रवासामुळे आलेला थकवा दूर करण्याची कामगिरी तो गुळाचा खडा करायचा. या गुळासोबतच काही वेळा शेंगदाणेही दिले जायचे. हे सारे पदार्थ कच्च्या रूपात होते. पण याच गूळ, शेंगदाणा व तुपाचा वापर करून गुडदाणा किंवा गुडदाणी तयार केली जायची. हा गुडदाणा म्हणजेच आपली आजची चिक्की. गुडदाणा हे ढोबळ रूप होतं तर चिक्की नेटकं. सहज म्हणून चघळल्या जाणाऱ्या गुडदाण्याला चिक्की नावाने मिळालेल्या प्रसिद्धीची कथा सुरस आहे.
१८८८ साली मुंबई-लोणावळा रेल्वेमार्गाचं काम जोरात सुरू होतं. याच ठिकाणी मगनलाल अगरवाल यांचं छोटंसं मिठाईचं दुकान होतं. त्या दुकानात गुडदाणा विकला जायचा. हा पदार्थ रेल्वेमार्गासाठी काम करणाऱ्या कामगारांचा आवडता होता. एकतर गूळ व दाणे यामुळे खूप सारी ऊर्जा मिळत असे आणि हा पदार्थ चवीलाही फक्कड होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो खिशाला परवडत असे. या पदार्थाची लोकप्रियता लक्षात घेऊन मगनलाल यांनी या गुडदाण्याला मगनलाल चिक्की या ब्रँडनेमसह लोकांपुढे आणलं. ही चिक्की जगप्रसिद्ध झाली. आज पुणे-मुंबई वा तत्सम प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाटेवर लोणावळा हा अलिखित थांबा या चिक्कीमुळेही निर्माण झाला आहे. याचा अर्थ चिक्कीचं मूळ फक्त महाराष्ट्रापुरतं आहे का? तर तसं नाही. भारतभरात विविध नावांनी चिक्की खाल्ली जाते. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये ती ‘लाइय्या पट्टी’ आहे, तर सिंधी लोकांची ‘लायी’. विशेष म्हणजे फक्त भारतातच नाही तर ब्राझीलमध्येही चिक्कीसारखाच पदार्थ आहे. pe-de-moleque या नावानं तो आवडीनं खाल्ला जातो. तर पराग्वे देशात चिक्कीसदृश ‘ka-ladrillo नामक पदार्थ आढळतो.
चिक्कीची खासियत ही की, ती काळासोबत जाणारी आहे. शेंगदाण्यासोबत तिची गट्टी जमली असली तरी तीळ, राजगिरा, काजू, बदाम, डाळं, कुरमुरे, सुकामेवा, चॉकलेट अगदी कशाकशाचं म्हणून तिला वावडं नाही. नव्या पिढीच्या आवडीनुसार तिनं स्वत:ला अपडेटेट ठेवलंय. म्हणूनच ‘उपवासाचं खाणं’ या मर्यादेत न अडकता ती स्वत:चं उत्तम मार्केटिंग करू शकली आहे. रेल्वेच्या ठेल्यापासून ‘लोणावळा चिक्की लोणावळा चिक्की’ असा पुकारा करत विक्री करणाऱ्या विक्रेत्यापर्यंत ती सर्वासोबत प्रवास करते. संध्याकाळी कामावरून सुटल्यावर कडकडून लागणाऱ्या भुकेसाठी पौष्टिक आधार बनते.
पौष्टिक, चवदार तरीही स्वस्त अशा खाण्याच्या क्रमवारीत चिक्कीचा क्रमांक वरचा आहे. तिची एकच माफक मागणी असते- आपापले दात मजबूत ठेवा. कवळीधारी किंवा दातदुखीनं हैराण मंडळींशी तिचं सख्य नाही. आपल्या दातांच्या मजबुतीची परीक्षा घ्यायला तिला आवडतं. अस्सल खवय्ये तिला ओढूनताणून तोडत नाहीत. चिक्की तोंडात घोळवत तिच्यातले दाणे, काजू, बदाम, पिस्ते व गूळ वेगवेगळं करत अगदी सुशेगातपणे ते तिचा आस्वाद घेतात. चिक्की कोणतीही असो आपल्या गोड चिकटपणानं ती आपल्याला धरून ठेवते. जोडून ठेवते. गुळात घोळून घेणारा शेंगदाणा जसा तिच्यात मिसळला जातो, चिक्की खाताना आपली अवस्था फारशी वेगळी नसते. तिच्या चिवटगोड चिकटपणात आपणही अडकतो. मात्र आनंदाने!