सलग दुसऱ्या दिवशी मद्य खरेदीसाठी मद्यग्राहकांनी लावलेल्या लांबलचक रांगामुळे वाद होऊ लागल्याने पोलीस बंदोबस्तात विक्री करावी लागली. दरम्यान, मद्य विक्री बंद करण्याची मागणी आमदार चंद्रकांत जाधव, हिंदू जनजागृती समिती यांच्यासह सामाजिक संघटनांकडून होत आहे.

राज्य शासनाने मद्य विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काल दुपारनंतर कोल्हापुरात विक्री सुरू झाली. ग्राहकांनी लांबलचक रांगा लावल्या. मद्य खरेदी वरून ग्राहकांमध्ये हाणामारीचे प्रसंगही घडले. दरम्यान, आज इचलकरंजी, जयसिंगपूर, पेटवडगाव यासह जिल्ह्याच्या अन्य ठिकाणी मद्य विक्री सुरू झाली. इचलकरंजी शहरांमध्ये वाइन शॉप चालकांनी दुकानासमोर बॅरिकेड लावून सामाजिक अंतर ठेवत विक्री सुरू केली. दुकान सकाळी दहा वाजता उघडण्याची परवानगी असली, तरी सकाळी सात वाजल्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंतराच्या रांगा लागल्या होत्या. गर्दी वाढत चालल्याने काही ठिकाणी पोलिसांना धाव घेऊन परिस्थिती नियंत्रित करावी लागली.

मद्यविक्री बंदीची मागणी

दरम्यान, कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी राज्यातील मध्ये मद्य विक्री बंद करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत ते म्हणाले, शासनाने उत्पन्न मिळवण्यासाठी मद्य विक्री सुरू केली असली, तरी अनेकांचा पैसा या मध्ये खरेदीसाठी खर्च होणार असून त्यातून कौटुंबिक वाद निर्माण होणार आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी शासनाने टाळेबंदी संपेपर्यंत मद्यविक्री बंदी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. महसूल वाढीसाठी सरकारांनी जनतेच्या आरोग्याशी खेळू नये. करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अन् समाजाच्या सर्वागीण हितासाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता रमेश शिंदे यांनी केली आहे.

दारूचे दुकान उघडे बघून लोकांनी हाहाकार माजवला आहे. शिक्षित-अशिक्षित गरीब-श्रीमंत पर्यंत सगळेच आतताई झाल्याचे अत्यंत अस्वस्थ सामाजिक चित्र असल्याने यावर बंदी घालावी, अशी मागणी अंनिसच्या सीमा रा. पाटील यांनी केली आहे.

Story img Loader