कोल्हापूर : मराठा आरक्षणा संदर्भात होणाऱ्या आंदोलनात भाजपच्या कार्यकर्ते हिरीरीने सहभागी होतील, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. भाजपा स्वत: आंदोलन करणार नाही, परंतु समाजाच्या आंदोलनात पक्ष कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होतील असे ते म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, की  मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी एकत्रित येऊन मार्ग काढला पाहिजे. या प्रश्नी ५८ मोर्चे काढले आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीचा विचार व्हायला हवा.

करोना संसर्ग वाढत असताना आंदोलन, उद्रेक सारखे शब्द उच्चारणे चुकीचे आहे, असे संभाजीराजे नुकतेच कोल्हापुरात म्हणाले होते. याचा धागा पकडत पाटील म्हणाले, की मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष नाही केला, तर वेळ निघून जाईल असे नमूद करून आंदोलनाची गरज व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींच्या भेटीवरून संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर बोलताना पाटील म्हणाले, की भाजपाने किती सन्मान दिला, हे संभाजीराजे सांगत नाहीत. त्यांना राष्ट्रपती नियुक्त संसद सदस्य केले. रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष करून मोठा निधी दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.